सिगारेटमुळे दरवर्षी १३.५ लाख भारतीयांचा मृत्यू; निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:12 IST2025-09-15T10:12:08+5:302025-09-15T10:12:58+5:30
देशात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावर केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी सरासरी १.७७ लाख कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.

सिगारेटमुळे दरवर्षी १३.५ लाख भारतीयांचा मृत्यू; निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला
नवी दिल्ली : भारतात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे प्रत्येक वर्षी १३.५ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वाढत्या धूम्रपानाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असतानादेखील धूम्रपान सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यावर उपाय म्हणून निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला.
देशात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारावर केंद्र सरकारला प्रत्येक वर्षी सरासरी १.७७ लाख कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.
निकोटीनच्या गोळ्यांचा धोका कमी
रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन (ब्रिटन) यांनी केलेल्या वैज्ञानिक अभ्यासात ज्वलनशील नसलेले निकोटीन किंवा निकोटीनच्या गोळ्या या धूम्रपानापेक्षा लक्षणीयरीत्या कमी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशोधनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे दिल्लीतील बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्मोनरी मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पवन गुप्ता यांनी नमूद केले आहे.
धूरविरहित निकोटीन पर्याय
सिगारेट किंवा इतर ज्वलनशील निकोटीन हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. याला पर्याय म्हणून धूरविरहित निकोटीनचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे हा उपाय धूम्रपानापेक्षा
९५ टक्के कमी हानिकारक असल्याचा दावा ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ नामक संस्थेने केला आहे.
३४ देशांमध्ये निकोटीन पाउच सिगारेटला पर्याय
जागतिक पातळीवर सिगारेटला पर्याय म्हणून निकोटीन पाउच लोकप्रिय होत आहे. स्वीडन, नॉर्वे, अमेरिका व डेन्मार्कसह जगभरातील ३४ देशांमध्ये सिगारेटला पर्याय म्हणून याचा वापर केला जात आहे.
भारतात धूम्रपान सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक पद्धतीने मर्यादित यश मिळते. त्यामुळे सुरक्षित, तंबाखूमुक्त निकोटीन पर्याय योग्यपणे नियंत्रित केले तर, सिगारेट सोडण्यास मदत होऊ शकते, असे मत एम्समधील डॉ. सुनैना सोनी यांनी व्यक्त केले.