मोदींच्या कोटासाठी १.२१ कोटींची बोली
By Admin | Updated: February 19, 2015 01:35 IST2015-02-19T01:35:07+5:302015-02-19T01:35:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटासाठी गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने बुधवारी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

मोदींच्या कोटासाठी १.२१ कोटींची बोली
लिलावाचा पहिला दिवस : गुजराती व्यापाऱ्यांमध्ये लागली चढाओढ
सूरत : ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असा स्वत:च्या पूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणून शिवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटासाठी गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने बुधवारी १.२१ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
मोदी यांनी बंद गळ्याचा हा कोट गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान परिधान केला होता. त्यांचा हा महागडा कोट नंतर राजकीय वादाचे कारण ठरला होता, हे विशेष!
येथील कापड व्यापारी राजेश जुनेजा यांनी लावलेली ही बोली दिवसातील सर्वात मोठी बोली ठरली.
पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात एकूण ४५५ भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंसह त्यांच्या या वादग्रस्त कोटाच्या लिलावासाठी सुरतच्या एसएमसी सायन्स कन्व्हेन्शन सेंटरतर्फे प्रदर्शन आणि लिलावाचे आयोजन करण्यात आले असून बोलीची ही प्रक्रिया २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता बंद होईल, अशी माहिती सुरतचे जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार यांनी दिली. या लिलावातून जमा होणारा निधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ गंगा मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लिलावात मोदी यांचा गडद निळ्या रंगाचा हा कोट सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
लिलावात दोन टी शर्टही
मोदींचे दोन टी-शर्टही या लिलावात ठेवण्यात आले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातील आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्यांना हे टी-शर्ट भेट दिले होते. (वृत्तसंस्था)
च्या कोटासाठी सर्वप्रथम सुरतमधीलच चार्टर्ड अकाऊंटंट पंकज यांनी ११ लाख रुपयांची बोली लावली होती. त्यानंतर काही मिनिटांतच राजू अग्रवाल यांनी ५१ लाखाचा प्रस्ताव मांडला, तर विराळ चौकसी यांनी थेट १ कोटी ११ लाखाला हा कोट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. दिवसअखेरीस राजेश जुनेजा यांनी १.२१ कोटीची किंमत देऊन सर्वांनाच धक्का दिला.
माझे
रोल
मॉडेल
च्‘मोदी माझे रोल मॉडेल आहेत. कठोर मेहनत घेण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्यांच्यात ठासून भरलेला आत्मविश्वास मला भावला आहे. त्यामुळेच हा सूट एक आठवण म्हणून मला हवा आहे. बोली आणखी वाढली तर मीसुद्धा आपली किंमत वाढविणार आहे. परंतु फारच वेगाने वाढली तर मात्र विचार करावा लागेल, असे या लिलावाचे सर्वात मोठे दावेदार, कापड व्यापारी राजेश जुनेजा म्हणाले.