झेंडावंदन करून परतताना 8 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 16:23 IST2017-08-15T16:19:07+5:302017-08-15T16:23:06+5:30
देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

झेंडावंदन करून परतताना 8 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
चंदीगड, दि. 15 - देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असताना चंदीगडमध्ये या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना येथे घडली आहे. शाळेत झेंडावंदन करून ही पीडित विद्यार्थिनी घरी परतत होती. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडच्या सेक्टर 23 मध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी येथील एका सरकारी शाळेत शिक्षण घेते. शाळेतून ध्वजारोहण करून ती परतत होती. रस्त्यात आरोपीने विद्यार्थिनीचं अपहरण केलं. तिला चिल्ड्रन पार्कमध्ये नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून सुटका करून पीडित विद्यार्थिनी स्वतःच्या घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार तिने घरच्यांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ 100 नंबरवर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पीडितेचं कुटुंब सेक्टर 24 मध्ये राहतं.
पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल (पॉस्को) अॅक्ट आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच पीडितेला वैद्यकिय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपासून वर्णिका कुंडू प्रकरणामुळे चंदीगड चर्चेत आहे.