चंदीगड/लखनौ : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तपास संस्थांनी हेरगिरीविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत गेल्या दोन आठवड्यांत पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातून एका यू-ट्यूबरसह १२ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पाकिस्तानशी धागेदोरे असलेले आणि उत्तर भारतात कार्यरत गुप्तहेरांचे हे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने तपासाअंती ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू केली आहे. यानुसार पंजाबमधून ६, हरियाणातून ५, तर उत्तर प्रदेशातून एकास अटक करण्यात आली आहे.
मे महिन्यात पोलिसांकडून झालेली कारवाई -४ मे : रोजी पंजाब पोलिसांनी फलकशेर मसिह आणि सुराज मसिह यांना अमृतसरमधून अटक केली. लष्करी कँटोन्मेंट परिसराची छायाचित्रे व सीमेवरील हवाई तळाची छायाचित्रे पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
११ मे : रोजी ३१ वर्षीय गझाला ही महिला व यामीन मोहम्मद या दोघांना पंजाब पोलिसांनी पकडले. गझालाने गुप्त माहिती पाकिस्तानी एजंटांना दिल्याची कबुली दिली आहे. तिला ३० हजार, २०-१० हजार अशी रक्कम यूपीआयच्या माध्यमातून मिळत होती.
१५ मे : रोजी सुखप्रीतसिंग आणि करनबीरसिंग यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती पुरवल्यावरून पकडण्यात आले. हरियाणा पोलिसांनी नौमन इलाही यास पानिपतमधून पकडले. पाठोपाठ देवेंदरसिंग याला अटक केली.१६ मे : रोजी हिसारमधून यू-ट्यूबर ज्योती मल्होत्रास अटक.१८ मे : रोजी अरमान याला नूह जिल्ह्यात पकडले.१९ मे : शहजाद याला उत्तर प्रदेशातून हरयाणातून मोहम्मद तारीफ याला पकडण्यात आले.