12 patients died due to lack of oxygen; Shocking incident in Madhya Pradesh | ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना


शहडोल : मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मिलिंद शिरालकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र, शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मृत्यूंमागे ऑक्सिजनची कमतरता असल्याचे वृत्त फेटाळले आहे. मृतांच्या नातेवाईकांनीही असा आरोप केला आहे की, सिलिंडरच्या कमतरतेमुळेच हे मृत्यू झाले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत, शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भोपाळ, इंदौर, येथे ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. उपचाराअभावी डॉक्टरचा मृत्यू
एस.पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये कोरोनामुळे शनिवारी ५१ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ जण पाटण्यातील, तर इतर जिल्ह्यांतील ४० जण होते. पीएमसीएचचे डॉक्टर डॉ. ललन प्रसाद यांचा मृत्यू त्यांना वेळेवर रुग्णालयात खाट व प्राणवायू न मिळाल्यामुळे झाला.
प्रसाद यांचे कुटुंबीय त्यांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी इकडून तिकडे फिरत राहिले; पण व्यर्थ. रात्री प्रसाद यांचा मृत्यू झाला. आयएमएचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले की, आमच्याशी संपर्क साधल्यावर आम्ही प्रयत्न केले; परंतु यश मिळाले नाही. उपचारांविनाच एक डॉक्टर मरण पावला. नालंदा जिल्ह्यातील नूरसराय विभागाचे गटविकास अधिकारी राहुल कुमार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल कुमार यांचा पाटण्यातील फोर्ड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी ते अँटिजन तपासणीत सकारात्मक निघाले होते. शेखपुरा जिल्ह्यात पंकज चौरसिया (२८)  यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने मृतदेह हॉटेलजवळ सोडून पळून गेले. हा प्रकार पोलिसांना समजल्यावर त्यांनी कुटुंबीयांची समजून काढल्यावर अंत्यसंस्कार केले गेले. कोरोनाची बाधा या जिल्ह्यात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाली आहे. याशिवाय अर्धा डझन बँक कर्मचारी मरण पावले आहेत.


 बँकव्यवस्थेवर परिणाम झाला असून, बँकांच्या अनेक शाखा बंद कराव्या लागल्या आहेत.
एनएमसीएचमध्ये प्राणवायूच्या टंचाईमुळे कोविड कक्षातील रुग्णांत घबराट निर्माण झाली आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी विभागीय प्रधान सचिवांना पत्र पाठवून अधीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने नाराज सिंह यांचे म्हणणे असे की, या रुग्णालयाचा प्राणवायूचा साठा दुसऱ्या ठिकाणी पा‌ठवला जात आहे. यामुळे रुग्णालयात अप्रिय घटना होऊ शकते व सगळा दोष मला दिला जाईल. कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत असल्यामुळे येथे ४०० ते ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज आहे. प्रत्यक्षात १०० सिलिंडर्सच उपलब्ध होत आहेत, असे सिंह म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 12 patients died due to lack of oxygen; Shocking incident in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.