रात्री १२ वाजताही मदतीला येईन - मोदींचे मुस्लिम नेत्यांना आश्वासन
By Admin | Updated: June 4, 2015 11:09 IST2015-06-03T09:10:06+5:302015-06-04T11:09:13+5:30
रात्री १२ वाजताही तुम्हाला माझी मदत लागली तर मी तुमच्यासाठी हजर असेन असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

रात्री १२ वाजताही मदतीला येईन - मोदींचे मुस्लिम नेत्यांना आश्वासन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - रात्री १२ वाजताही तुम्हाला माझी मदत लागली तर मी तुमच्यासाठी हजर असेन असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. मंगळवारी मोदींनी मुस्लिम बांधवांच्या ३० सदस्य असलेल्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वीही उपस्थित होते.
'आपले सरकार देशातील १२५ कोटी जनतेचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत
तुम्हाला रात्री १२ वाजता जरी माझी मदत लागली तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन' असे आश्वासनही त्यांनी दिले. 'मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुस्लिमांच्या मतावरून आजपर्यंत केलेल्या राजकारणामुळे देशाला मोठा फटका बसला आहे. मात्र फुटीच्या राजकारणावर आपला विश्वास नसून धार्मिक भेदभावाची भाषा मी कधी करणार नाही', असेही ते म्हणाले. माझ्या कामावरून माझे मूल्यांकन करा, माझे विरोधक माझ्यावर काय आरोप करतात यावरून माझी पारख करू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रोजगार व विकास हाच सर्व समाजाच्या समस्यांवर उपाय असून त्यादृष्टीने आपलं सरकार काम करत आहे, असेही मोदींनी या शिष्टमंडळाला सांगितले. सरकारकडून घेण्यात येणारे निर्णय व उपाययोजनांची माहितीही मोदींनी त्यांना दिली.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मोदींनी अल्पसंख्यांकांविरोधातील विधाने खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा संघ परिवाराला दिला होता. आमचे सरकार कोणत्याही समुदायाविरुद्ध भेदभाव वा हिंसाचाराला मुळीच थारा देणार नाही. प्रत्येक नागरिकाला देशाच्या घटनेने धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.