दुर्दैवी! टॉयलेटचं दार समजून एक्झिट दरवाजा उघडला; धावत्या ट्रेनमधून पडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 15:41 IST2021-10-14T15:37:02+5:302021-10-14T15:41:20+5:30
रात्रीच्या सुमारास घडला अपघात; दहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दुर्दैवी! टॉयलेटचं दार समजून एक्झिट दरवाजा उघडला; धावत्या ट्रेनमधून पडून मुलाचा मृत्यू
कोट्टायम: धावत्या ट्रेनमधून खाली पडल्यानं केरळमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. टॉयलेटचं दार समजून एक्झिट डोअर उघडल्यानं हा प्रकार घडला. मोहम्मद इशान असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तो मल्लपुरम येथील ममबादूचा रहिवासी आहे. कोट्टायममधील मोलावत्तोम येथे रात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
मोहम्मद इशान त्याच्या कुटुंबासोबत कोचुवेली-निलांबुर राज्य राणी एक्स्प्रेसमधून थिरूअनंतपुरम येथून मल्लपुरमला परतत होता. रात्री मोहम्मद टॉयलेटला जाण्यासाठी उठला. मोहम्मद ट्रेनमधून खाली पडल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीयांनी चेन ओढून ट्रेन थांबवली.
इशानच्या कुटुंबीयांनी रेल्वे रुळांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत शोधाशोध सुरू केली. त्यावेळी इशान गंभीर जखमी अवस्थेत एका नाल्यात सापडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र त्याचे प्राण वाचवण्यात अपयश आलं. इशानच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.