10 crore doses of Sputnik V to be manufactured by Indian company; Vaccination at the beginning of the new year? | भारतीय कंपनी बनविणार स्पुटनिक व्हीचे 10 कोटी डोस; नववर्षाच्या सुरुवातीलाच लस?   

भारतीय कंपनी बनविणार स्पुटनिक व्हीचे 10 कोटी डोस; नववर्षाच्या सुरुवातीलाच लस?   

मॉस्को : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या १० कोटींपेक्षा जास्त डोसचे उत्पादन भारतातील हेटेरो ही औषध कंपनी करणार आहे. या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत १० डॉलर असेल. 

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढच्या वर्षीच्या प्रारंभीपासून स्पुटनिक व्ही या लसीच्या कोट्यवधी डोसच्या उत्पादनाला सुरुवात होईल. ही लस ९५ टक्के परिणामकारक आहे, असा दावा रशियाने नुकताच केला होता. स्पुटनिक व्हीप्रमाणेच जगभरातील काही कंपन्यांनी आपापल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेचे अंतरिम अहवाल प्रसिद्ध केले आहेत. प्रत्येक कंपनीने आपली लस ९० टक्के किंवा त्याहून जास्त प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

रशियाने स्पुटनिक व्ही लसीची गेल्या ऑगस्ट महिन्यात सरकार दरबारी नोंदणी केली. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. संबंधित देशांच्या औषध नियंत्रकांनी मान्यता दिल्यास जगभरात पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत १० कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

नववर्षाच्या सुरुवातीलाच लस? प्रारंभी ३५ कोटी लोकांना लस देणार

नवी दिल्ली : पुढच्या वर्षाच्या प्रारंभीच कोरोना लस विकसित झाल्याची खूशखबर तमाम भारतीयांना मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला ३५ कोटी लोकांना ही लस टोचली जाणार आहे. लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे असे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोना लस विकसित करत असलेल्या तीन कंपन्यांच्या प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भेट देऊन तेथील संशोधनाच्या प्रगतीची माहिती घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी वॅक्सिन बूथ बनविण्यात येतील तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अ‍ॅपही तयार केले आहे. एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. देशातील २१ वैद्यकीय संस्थांमध्ये सुमारे २५ हजार लोकांवर कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जात आहेत. कोवॅक्सिनची सँपल साइज इतर लसींपेक्षा मोठी आहे.

पाच टप्प्यांत लसीकरण मोहीम
कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रारंभी ३५ कोटी लोकांना ही लस देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १ कोटी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, नर्स, आशा कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कोरोना योद्धयांना ना ही लस देण्यात येईल. त्यामध्ये पालिका कर्मचारी, पोलीस, सुरक्षा जवानांचा समावेश असेल. तिसऱ्या टप्प्यात सरकारी कर्मचारी, चौथ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेले २६ कोटी लोक व पाचव्या टप्प्यात युवकांना लस टोचली जाईल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 10 crore doses of Sputnik V to be manufactured by Indian company; Vaccination at the beginning of the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.