The Zilla Parishad office was filled with dust and fury | जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले
जिल्हा परिषदेचे कार्यालय धूळ, जळमटांनी माखले

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदी : सीईओकडून स्वच्छतेचे आदेश

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१९-२०चे स्वच्छ सर्वेक्षण सध्या केले जात असून, त्यात गावागावांत साफसफाई करून त्याचे गुणांकन केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांना तसेच पंचायत समित्यांना भेटी दिली असता, अनेक कार्यालये धूळ, जळमटांनी माखले असून, तुटलेले फर्निचर, अडगळीचे सामान पडलेले आढळून आल्याने दिव्याखाली अंधारासारखी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आदेश भुवनेश्वरी यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे यंदाही हा क्रमांक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावोगावी स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत केले जात असलेले काम पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना भेटी दिल्या असता, त्यात अत्यंत गलिच्छता आढळून आली आहे. अनेक ठिकाणी बंद असलेले संगणक, प्रिंटर अजूनही टेबलांवरच पडून असून, टेबल फॅन, कार्यालयातील ट्युबलाइट, कपाटे, नस्त्यांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयातील खोल्यांचे कोपरे, छताला धूळ, जळमटे लागल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पाहून भुवनेश्वरी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून महिन्याच्या दर तिसऱ्या शनिवारी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत प्रत्येक कार्यालयाने आपापल्या कार्यालयाची स्वच्छता करावी, असे आदेशही दिले आहेत. प्लॅस्टिक बंदीबाबत जागृती
कार्यालयातील स्वच्छतेप्रमाणेच सरकारने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीबाबत जाणिव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दैनिक वापरामध्ये व कार्यालयातील कामकाजात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या आहेत.विजेचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी कार्यालयातील विजेच्या उपकरणांचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा व विजेची बचत करावी अशा सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत.


Web Title: The Zilla Parishad office was filled with dust and fury
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.