शांततेसाठी तरुणांची जागृती फेरी
By Admin | Updated: October 24, 2016 01:00 IST2016-10-24T00:59:35+5:302016-10-24T01:00:36+5:30
शांततेसाठी तरुणांची जागृती फेरी

शांततेसाठी तरुणांची जागृती फेरी
नाशिक : कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता जातीय सलोखा कायम राखत नाशिकची शांतता आबाधित ठेवण्याचा संदेश देत शहरातून शांतता फेरी काढण्यात आली. निमाणी येथून निघालेल्या यात्रेचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. फेरीमध्ये तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.
नाशिक महानगर युवा आघाडी यांच्या वतीने सदर शांतता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. समाजात निर्माण झालेला जातीय तेढ दूर होऊन सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता निमाणी येथून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. ‘मी नाशिककर, मला घराणेशाही, गुन्हेगारी, भ्रष्टाचारमुक्त नाशिक हवं आहे’ असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट तरुणांनी परिधान केले होते.
शहरात शांतता निर्माण करण्याचे प्रबोधनपर फलक हातात घेऊन निघालेल्या तरुणांची मार्गातील चौकाचौकात देशभक्तीपर गीते सादर केली. ५०हून अधिक तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. माजी पोलीस अधिकारी डॉ. संजय अपरांती यांनीही रॅलीत सहभाग नोंदविला.
हुतात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या समवेत तरुणांनी शहर शांततेची शपथ घेतली. यावेळी देवेंद्र पाटील, निशिकांत पगारे, नाना बच्छाव, शाहीर ताराचंद भारतीय, विनायक येवले, आयोजक समाधान भारतीय, योगेश कापसे, सार्थक सोनवणे, रोहन जाधव, गोपी माळी, वैभव कुलकर्णी, मयूर शेवाळे, स्वप्निल वडजे, सचिन शिंदे, विष्णू भारतीय, सुनील भारतीय, अनिल भारतीय, बाबासाहेब भारतीय, अमित नाठे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)