हॉटेलच्या खाद्यपदार्थांकडे युवकांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:25 IST2019-08-28T00:25:08+5:302019-08-28T00:25:35+5:30
हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे.

हॉटेलच्या खाद्यपदार्थांकडे युवकांचा ओढा
नाशिक : हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरच्या मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले. एचपीटी आर्ट्स अॅन्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘तरुणाईच्या बदलत्या खाण्याच्या सवयी’ या विषयावर सर्वेक्षण केले, यात हा निष्कर्ष आढळला आहे.
शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सदरचे सर्वेक्षण विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रीयन अन्न हे परिपूर्ण मानले जाते.
शरीरासाठी आवश्यक ते सगळे पोषक घटक महाराष्ट्रीयन अन्नातून मिळतात. पण तरीही हल्ली तरुणाई महाराष्ट्रीयन अन्नापेक्षा जंकफूड, साउथ इंडियन, चाट, इटालियन, चायनीज या पदार्थांना अधिक पसंती देतात. तसेच पॅकिंगफूडदेखील मोठ्या प्रमाणात मागविले जातात. रस्त्यावरील हातगाडी विक्रेत्यांकडील पोहे, उपमा, आप्पे या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा विद्यार्थी मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना नाश्ता करतेवेळी प्राधान्य देतात. सर्वेक्षणानुसार स्वच्छतेबरोबर सकस, पोषक घटकांना ७४ टक्के विद्यार्थी महत्त्व देतात. तर निव्वळ ७ टक्के विद्यार्थी या घटकांना दुय्यम मानतात.
उरलेले १९ टक्के विद्यार्थी प्रत्येक वेळी नाही पण बऱ्याचदा या घटकांचा विचार करतात. दीक्षित-दिवेकर डाएटची सगळीकडे चर्चा असली तरी केवळ ८ टक्के विद्यार्थी हे डाएट करतात, तर ८४ टक्के विद्यार्थी हे डाएट करत नाहीत. प्रत्येकावर समाजमाध्यमांवरील पोस्टचा परिणाम होत असतो. उपाहारगृहांमध्ये नाश्ता करताना पोहे, उपमा या महाराष्ट्रीयन पदार्थांपेक्षा मॅगी, समोसा चाट, इडली या पदार्थांना विद्यार्थी पसंती देतात.
युवकांच्या खाण्याच्या सवयीत बदल
खाद्यपदार्थांविषयी पोस्ट वाचून ५२ टक्के विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयीत बदल होतो तर ४८ टक्के विद्यार्थ्यांमध्ये कोणताही बदल होत नाही, असे निदर्शनास आले. सर्वेक्षणानुसार ४८ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येण्यापूर्वी नाश्ता करून येतात तर ३४ टक्के विद्यार्थी महाविद्यालयात आल्यावर कॅन्टीन किंवा बाहेर नाश्ता करतात. उर्वरित १८ टक्के विद्यार्थी कधी घरून तर कधी बाहेर नाश्ता करतात.