गोमातेच्या मदतीला धावले युवा फाउण्डेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:03 IST2020-04-21T22:03:17+5:302020-04-21T22:03:29+5:30
डॉ. खैरनार यांनी युवा कार्यकर्त्यांच्या मदतीने वासरावर उपचार

गोमातेच्या मदतीला धावले युवा फाउण्डेशन
नांदगाव : ‘आईविना कुणी नाही... खाण ती वात्सल्याची’ या काव्यपंक्तीला मुके प्राणीसुद्धा अपवाद नाहीत. भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवजात वासराच्या रक्षणासाठी खंबीरपणे चारी पाय रोवून उभ्या असलेल्या गोमातेला युवा फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याने कोवळ्या वासराचा जीव वाचला.
लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर भटकणाऱ्या एका गायीने काही दिवसांपूर्वी रेल्वे वसाहतीजवळ एका वासराला जन्म दिला. त्यात भटक्या श्वानांनी नवजात वासरावर हल्ला चढवत त्याच्या पायाला चावे घेतले. श्वानांचा हा रानटी हल्ला गायीने निकराने परतवून लावला. ही बाब पादचारी भूषण कोठावदे यांच्या लक्षात आली. त्यांनी युवा फाउण्डेशन सामाजिक संस्थेशी संपर्क साधल्यानंतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. डॉ. खैरनार यांनी युवा कार्यकर्त्यांच्या मदतीने वासरावर उपचार केले. संदीप जेजूरकर, प्रसाद वडनेरे, सचिन आहेर, पप्पू भोसले, जितेंद्र भोसले, सुमित सोनवणे, निखिल रांगोळे, उबेद शेख, किरण शेवाळे आदींनी मदत केली. जखम बांधल्यावर वासराची व आईची भेट झाली.