त्र्यंबकच्या गंगासागरमध्ये युवक कोसळला
By Admin | Updated: December 3, 2014 01:53 IST2014-12-03T01:52:12+5:302014-12-03T01:53:15+5:30
त्र्यंबकच्या गंगासागरमध्ये युवक कोसळला

त्र्यंबकच्या गंगासागरमध्ये युवक कोसळला
त्र्यंबकेश्वर : येथील गंगासागर तलावात मित्रांसह पोहण्यासाठी गेलेला युवक खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी पाण्यात कपड्यासह उडी मारून त्यास वर काढले. तोपर्यंत तेथील रहिवाशांनी नगरपालिकेचा अग्निशामक दलाला फोन केला. १०८ क्रमांकावरील डॉक्टर, पोलीस आदि घटनास्थळी केवळ ५ ते ६ मिनिटात आले. त्यानंतर पोलीसदेखील आले. शेवटी युवकाचा जीव वाचविला... आणि जिल्हा व तालुका यंत्रणेने केलेले मॉकड्रिल यशस्वी झाले. आगामी सिंहस्थातील संभाव्य दुर्दैवी प्रसंगांची ही रंगीत तालीम होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ पुढील वर्षाच्या पावसाळ्यात भरणार आहे. गत २००३-२००४ च्या कुंभमेळ्यापेक्षा यावेळेस दुपटी-तिपटने गर्दी होणार आहे. गर्दीमुळे पाण्यात बुडणे, अतिरेक्यांच्या लिस्टवर भारताची तीर्थक्षेत्र असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था, भाविकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनावर आहे. कुंभमेळा ऐन पावसाळ्याच्या मध्यावर असल्याने पूर, वादळ, आग, चेंगराचेंगरी अशा दुर्घटना घडल्यास कोणी बाधीत होऊ नये म्हणून अगोदरच काय काय उपाययोजना करता येऊ शकतील, काय काय त्रुटी राहतात यासाठी हे मॉकड्रिल करण्यात आले. यासाठी जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार बाळासाहेब शेवाळे, राजेंद्र कांबळे, १०८ वैद्यकीय पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कुलथे, आर.एच.चे डॉ. विठ्ठल काळे, स्टाफ नर्स, अग्निशामक पथकाचे नितीन शिंदे (चालक), भाऊराव सोनवणे आदिंनी सहभाग नोंदवून वेळेत मदत पोहोचती केली. विशेष म्हणजे बुडण्याचे नाटक करणारा व बेशुद्ध पडण्याचा अभिनय करणारा युवक विनायक वाघमारे, पथक नायक भूषण गंगापुत्र, विकी गंगापुत्र, भूषण भोई, संदीप वाघ, किरण महाले, गणेश पालवे (हे सर्व येथील जीवरक्षक पथकाचे सभासद आहेत). या उपक्रमाचे मार्गदर्शक व संकल्पना प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रशांत पाटील यांची होती. (वार्ताहर)