Nashik Crime: ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. येवला तालुक्यातील देवळाणे येथील १८ वर्षाच्या यशराज बोर्डे या तरुणाने पब्जीच्या खेळात आलेल्या नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यशराजची सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने त्याच्या मानसिक स्थितीबद्दल लिहिलेले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो या गेमच्या आहारी गेल्याची चर्चा आहे. पब्जी खेळण्याच्या आहारी गेल्याने तो नैराश्यात होता. यशराज हा १९ ऑगस्टपासून बेपत्ता होता. गुरुवारी सकाळी गावातील विहिरीत यशराजचा मृतदेह आढळून आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराजला पब्जी या मोबाइल गेमचे गंभीर व्यसन लागले होते. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे. यशराजने जीवन यात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिले असून, त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची येवला तालुका पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पब्जी या खेळामध्ये खेळणाऱ्याला एक टास्क दिला जातो. या टास्कपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या अनेकांनी आपले जीवन संपविले आहे. याबाबत पालकांनीच आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिठ्ठीत काय म्हटलं?
"मी जे काही केले ते पहिल्यांदाच नाहीये. मी हे अनेक वेळा करून पाहिले आहे पण आजपर्यंत यशस्वी झालेलो नाहीये. पण आज असे वाटते की मी आज यशस्वी होईन. मी तर पाच वर्षांपूर्वीच मेलोय. फक्त माझे शरीर जिवंत आहे. माझ्या मनाने फक्त शक्यता आणि भ्रम निर्माण केले होते की मला जे हवे आहे ते मिळेल. पण पाच वर्षांनंतर मला कळले की फक्त माझ्या मनालाच माझे शरीर जिवंत ठेवायचे आहे. या सर्व गोष्टी फक्त भ्रम आणि बनावट होत्या," असं यशराज बोर्डेच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
मोबाइल न दिल्याने तरुणाने मारली पुलावरून उडी
मालेगावच्या जुन्या महामार्गावरील नवीन बस स्थानकासमोर एका तरुणाने कॉल करण्यासाठी इतरांकडे मोबाइल मागितला मात्र कुणीही मोबाईल न दिल्याने त्याने थेट उड्डाणपुलावरून खाली उडी मारल्याची घटना गुरुवारी शहरात घडली.
या घटनेतील तरुणाच्या सांगण्यानुसार तो मूळचा बिहार येथील असून, त्याचे नाव बिटुकुमार आहे. तो सेंट्रींग कामासाठी गुरुवारी सकाळी ६ वाजता शहरात आला होता. शहरात आल्यावर त्याच्या मोबाइलचा रिचार्ज संपलेला असल्याने फोन करण्यासाठी त्याने अनेकांकडे मोबाईल मागितला. मात्र, मोबाइल न देता त्याला काहींनी त्रास दिला. तेव्हा, तो उड्डाण पुलाच्या भिंतीवर चढला. त्याला खाली उतरण्याची नागरिकांनी विनवणी केली. मात्र, मला फक्त मोबाइल द्या, अशी मागणी केली. त्यानंतर त्याने खांद्यावरील सॅक पुलावर टाकून थेट पुलाच्या भिंतीवरून खाली उडी घेतली. या पुलाची उंची सुमारे ३० फुट असल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचा एक हात फॅक्चर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.