वेळेत उपचार न झाल्याने युवतीचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:33 IST2019-12-20T16:32:49+5:302019-12-20T16:33:04+5:30
रस्ताच नसल्याने वेळेत उपचाराअभावी जीवाला मुकावे लागल्याची दुदैवी घटना

वेळेत उपचार न झाल्याने युवतीचा सर्पदंशाने मृत्यू
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथे सर्पदंश झालेल्या युवतीला रुग्णालयात नेण्यासाठी गावातून रस्ताच नसल्याने वेळेत उपचाराअभावी जीवाला मुकावे लागल्याची दुदैवी घटना घडली आहे. हेदपाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली असली तरी अद्याप कामाला सुरुवात होत नसल्याने गावकऱ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत असल्याचे विषण्ण करणारे चित्र समोर आले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाड येथील कु. ककीता गणपत किलबिले (१८) ही युवती शेती कामासाठी घराबाहेरीलच रानात गेली होती. यावेळी शेतीकाम करत असतानाच ककीताला सर्पदंश झाला. ककीताला साप चावल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांनी धावपळ करत १०८ क्रमांकावर संपर्क साधून रूग्णवाहिका पाठविण्यासाठी कळविले. परंतु, हेदपाडा गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका निम्म्या रस्त्यावरच येऊन थांबली. त्यामुळे ककीताला गावातून डोली करुन दवाखान्यात पोहोचविण्यात आले. परंतु, दवाखान्यात नेईपर्यंत ककीताची प्राणज्योत रस्त्यातच मालवली. वेळेत उपचार न मिळाल्याने ककीताचा दुदैवी अंत झाला. हेदपाडा गावापर्यंत रस्ताच नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हाल होत असते. लोकप्रतिनिधींचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.