मांगीतुंगी येथे पिकअपखाली चेंगरून तरुण ठार
By Admin | Updated: May 11, 2017 00:53 IST2017-05-11T00:53:20+5:302017-05-11T00:53:32+5:30
सटाणा : मांगीतुंगी देवस्थान मालकीच्या पिकअपखाली चेंगरून मोटर-सायकलस्वार जागीच ठार झाला,तर दुसरा तरु ण गंभीर जखमी झाला

मांगीतुंगी येथे पिकअपखाली चेंगरून तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : मांगीतुंगी देवस्थान मालकीच्या पिकअपखाली चेंगरून मोटर-सायकलस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा तरु ण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना भिलवाड ते मांगीतुंगी पर्वतमार्गावर बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे गरीब आदिवासी युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संतप्त भिलवाडच्या आदिवासी महिला व पुरु षांनी तब्बल चार तास मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
बागलाण तालुक्यातील भिलवाड येथील सुरेश दयाराम माळी (२६), विनोद चुनीलाल सोनवणे (२७) हे दोघे मित्र कामानिमित्त बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच ४१ टी ५५६३) मांगीतुंगी पर्वतमार्गाकडे जात होते त्या वेळी असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे पीकप व्हॅन (एमएच ४१ . ५१०८) खाली सापडून सुरेश माळी याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर विनोद सोनवणे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. ठाकूरवाड यांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र भिलवाडचे ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर मांगीतुंगी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिसांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेशच्या तीन मुलांच्या संगोपनाबरोबरच जखमी विनोदच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी उचलण्याची हमी दिल्यानंतर नातेवाइकांनी चार तासांनी सुरेशचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.