ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्तीचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:54 IST2018-09-27T16:53:49+5:302018-09-27T16:54:06+5:30
इगतपुरी तालुका : १५ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित; नांदगाव सदोमध्ये २५ वर्षांनंतर निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्तीचा वरचष्मा
इगतपुरी : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा निकाल गुरुवारी (दि.२७) घोषित करण्यात आला. संपूर्ण निकाल पाहता ह्या निवडणुकीत युवकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले. २५ वर्षांपासून एकदाही निवडणूक न झालेल्या नांदगाव सदो ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या उमेदवारांना यश संपादित करता आले. कृष्णनगर ग्रामपंचायतीत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी २५ वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. ग्रामपंचायतीत वार्ड क्र मांक २ मधील तीनही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने दोन उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे यामधील एक उमेदवार गेल्यावेळी चिठ्ठी पद्धतीने पराभूत झाला होता. तो यावेळी चिठ्ठीने तारला. विजयी उमेदवार आण त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
इगतपुरी तालुक्यातील धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दौंडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे आणि नांदगावसदो ह्या १५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. नांदगाव सदो येथे चुकीचे आरक्षण असल्याच्या मुद्यांवरून गेल्या २५ वर्षांपासून निवडणूक झालेली नव्हती. यावेळी झालेल्या निवडणुकीत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे उमेदवार विजयी झाले. टाकेघोटी येथे एकही अर्ज न आल्याने सरपंचाची जागा रिक्त राहिली.
तिनही उमेदवारांना समान मते
इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर ग्रामपंचायतीत वार्ड क्र मांक २ मध्ये निकाल लागताना वेगळाच चमत्कार घडला. या वार्डातील तिन्ही उमेदवारांना समसमान ९५ मते मिळाली. या उमेदवारांतुन २ उमेदवार निवडून द्यायचे असल्याने तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदारांच्या दालनात चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यामध्ये सुरेखा धोंगडे, सोनाली धोंगडे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.