लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कपालभाती, भामरी, अनुलोम विलोम यासारख्या प्राणायामासह ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, बद्रासन, वज्रासन, मकरासन, पवनमुक्तासन, शवासनासारख्या उपयुक्त आसनांच्या प्रात्यक्षिकांसह त्यातून मिळणाऱ्या लाभांची माहिती हजारो नाशिककरांनी अनुभवली. डॉ. किरण जैन आणि डाॅ. प्रेमचंद जैन यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली योगप्रेमींनी योगसप्ताहातून शरीरस्वास्थ्याची अनुभूती घेतली.
लोकमत, योग विज्ञान प्रबोधिनी व सुयोजित बिल्डर्स यांच्यातर्फे सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १५ ते २१ जून २०२१ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ७.४५ या वेळेत रोज ४५ मिनिटे ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या योग शिबिरात योग विज्ञान प्रबोधिनीच्या नाशिकच्या योग प्रशिक्षकांनी आयुष प्रोटोकॉलप्रमाणे कयाचालन, आसन, प्राणायाम, ध्यान अशा विविध योगाभ्यास प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून सहभागी योगाभ्यासकांना मार्गदर्शन केले. या योग शिबिराचे नाशिक लोकमत इव्हेंट्स या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे आयोजित या योग शिबिरात सर्वांना योगाभ्यासाचे प्राथमिक धडे गिरवता आले. या शिबिरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सर्वांना विनामूल्य सहभागाची संधी देण्यात आली होती.
------------------------------
अत्यावश्यक सूचना ‘लोकमत’चा लोगो वापरावा.