येवल्याच्या दुचाकीचोराला म्हसरूळमध्ये अटक; आठ मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 21:34 IST2017-10-26T21:34:17+5:302017-10-26T21:34:32+5:30

येवल्याच्या दुचाकीचोराला म्हसरूळमध्ये अटक; आठ मोटारसायकली जप्त
नाशिक : येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणार्या अट्टल दुचाकीचोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरूवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने त्याला ताब्यात घेतले.
येवला शहरात मुख्य बाजारपेठसह गर्दीच्या ठिकाणांवरून मोठ्या संख्येने दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरट्यांनी येवल्यात घातलेला धुमाकूळाने नागरिक त्रस्त झाले असताना अखेर एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या गळाला लागला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांनी तपासाची सुत्रे फिरवून कमी किंमतीत बनावट वाहनक्रमांक तयार करुन विक्री करणार्या चोरट्यांचे ‘नाशिक-येवला’ क नेक्शन तपासण्यास सुरूवात केली. दरम्यान, ऋषिकेश अरुण आहेर (२८) हा तरुण दुचाकी चोरून कमी किंमतीत विक्री करत असल्याचे खात्रीलायक वृत्त करपे यांना मिळाले. यानुसार त्यांनी म्हसरूळ परिसरात सापळा लावला. पथकासह म्हसरुळ गाव पिंजून काढत पोलिसांनी ऋ षिकेश यास अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता कुठल्याही प्रकारचे हत्त्यार वगैरे मिळून आले नाही; मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराचे नाव, पत्ता आदि माहिती सांगत येवल्यामधून चोरलेल्या आठ दुचाकी कोठे दडवून ठेवल्या, ती जागा दाखविली. पोलिसांनी सदर जागेवरून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, येवल्याच्या दुचाकीचोराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने तेथील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये दोन स्पेलेंडर-प्लस, एक स्पेलेंडर-प्रो, अपाचे, टीव्हीएस स्टार सिटी, शाईन, बुलेट या प्रकारच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत असून या दुचाकीचोरट्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.