संगमेश्वराची यात्रा रद्द, जोगलटेंभीचे शिवालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:35 IST2021-03-11T22:04:39+5:302021-03-12T00:35:27+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला.

संगमेश्वराची यात्रा रद्द, जोगलटेंभीचे शिवालय बंद
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला.
गोदावरी व दारणा या दोन नद्यांचा दक्षिणमुखी संगम असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीला येथे संगमेश्वराची मोठी यात्रा भरत असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा शासन नियमानुसार रद्द करण्यात आली. सकाळी सरपंच सुरेखा पिंपळे, उपसरपंच सौरभ जेजुरकर, महंत मोहनदास महाराज व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर, मंदिर बंद करण्यात आले. कोरोनामुळे यात्रा बंद करण्यात आल्याचे ग्रामपंचायत व संगमेश्वर ट्रस्टच्या वतीने जोगलटेंभीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर भाविकांना फलकाद्वारे दोन दिवसांपूर्वीच आवाहन करण्यात आले होते.
संगमावर जाणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता. तरीही, भाविक दर्शनासाठी व गंगाजल घेण्यासाठी येत होते. मात्र, उपसरपंच सौरभ जेजुरकर, विलास गाडेकर, धनंजय पिंपळे, विनायक जेजुरकर, विष्णू तांबे, विकास कमोद, सतीश जेजुरकर, धनंजय पिंपळे, लक्ष्मण भास्कर आदी ग्रामस्थ भाविकांना थांबवून माघारी पाठवण्याची जबाबदारी पार पाडत होते.
फोटो - ११ जोगलटेंभी यात्रा
सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर भरणारी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात असा शुकशुकाट होता.