पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ
By Admin | Updated: January 21, 2016 22:10 IST2016-01-21T22:09:12+5:302016-01-21T22:10:13+5:30
पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ
पाळे खुर्द : येथील जागृत देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री अष्टभुजादेवीचा यात्रोत्सव शनिवारपासून (दि.२३) सुरू होणार असल्याची माहिती यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन पाटील व रावसाहेब पाटील, जिभाऊ पाटील उपस्थित होते.
शनिवारी सकाळी ७ वाजता मंदिराचे पुजारी ज्योतिर्भास्कर सुनील पाठक यांच्या हस्ते कलश पूजन, ध्वजारोहणानंतर दिवसभर भजन, कीर्तन, महाआरती, होमहवन आदि कार्यक्रम होतील. दुपारी २ वाजता श्री अष्टभुजादेवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री ९ वाजता मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होईल. दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी कुस्त्यांची दंगल तर दि.२५ रोजी यात्रेची सांगता व भंडारा होईल. ग्रामपंचायतीकडून यात्रोत्सवादरम्यान पथदीप व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
येथील श्री अष्टभुजा देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याची आख्यायिका आहे. सुरतेच्या लुटीनंतर परतीच्या मार्गाने जाताना गिरणा नदीच्या पात्रातून मार्ग काढत महाराज पाताळेश्वर म्हणजे आताचे पाळे खुर्द येथे आले. महाराजांना घनदाट जंगलात आज ज्या ठिकाणी अष्टभुजा देवीचे मंदिर तेथे एक पर्णकुटी दिसली. त्या दिशेने महाराज गेले तेव्हा तेथे एक आदिवासी जोडपे गिरणा नदीच्या तिरावर राहत असल्याचे दिसले. महाराजांनी आदिवासी महिलेला आपली ओळख सांगितली. ती आदिवासी महिला आश्चर्यचकीत झाली व महाराजांना विनंती केली की, आजचा मुक्काम हा आपण सर्वांनी माझ्या पर्णकुटीवर करावा. महाराजांनी विनंती स्वीकारून मुक्काम केला. महाराजांनी आपल्याबरोबर आणलेला शिधा त्या महिलेला दिला. महिलेने महाराजांना पळसवृक्षाच्या पानावर गोलाकार पद्धतीने भात, कढी व त्यावर कढीपत्ता असलेली फांदी शिजवून ठेवलेली होती व बाजूला चटणी होती. त्यावर महाराजांनी महिलेला विचारले हे काय भोजन आहे. त्यावर महिला उत्तरली कढीची पाळ गोलाकार पद्धतीने भात भिजवून मग सेवन करावयाची त्यावर महाराजांना गनिमीकावा संकल्पना सुचली असेच आपण शत्रूच्या किल्ल्याला गोलाकार वेढा मारला तर आपल्या किल्ला सहज जिंकता येईल या कल्पनेने कढीची पाळ. पाळ हा शब्द स्मरणात राहिल्याने मौजे पाताळेश्वर गावाचे नामकरण महाराजांनी पाळे खुर्द केले. दुसऱ्या दिवशी गिरणात स्नान करून पाळे खुर्द येथील आदिवासी जोडप्याच्या पर्णकुटी शेजारी दगडाची एक चिरा उभी केली. आदिवासी जोडप्याला उपस्थितीत आठही दिशा फिरल्यानंतर महाराजांना राजधानी रायगडकडे जाण्याची दिशा मिळाली व त्यांनी श्री अष्टभुजा देवीची स्थापना करुन पौष पौर्णिमेस देवीचा यात्रोत्सव सुरू करण्याची प्रार्थना केली व तसेच येथील जनतेला पीक, धनधान्य येऊ दे व गुण्यागोविंदाने यात्रोत्सव पाळे खुर्द जनतेला साजरा करू दे, अशी प्रार्थना केली व तेव्हापासून हा यात्रोत्सव साजरा केला जातो. (वार्ताहर)