निऱ्हाळे फत्तेपूरच्या सरपंचपदी यादव; उपसरपंचपदी सांगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:53 IST2021-02-26T17:52:32+5:302021-02-26T17:53:16+5:30
निऱ्हाळे: सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा यादव तर उपसरपंचपदी विष्णू सांगळे विजयी झाले.

निऱ्हाळे फत्तेपूरच्या सरपंचपदी यादव; उपसरपंचपदी सांगळे
निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी मनीषा यादव व योगिता जाधव तसेच उपसरपंचपदासाठी विष्णू सांगळे व किरण थोरात यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाल्याने जाधव यांनी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यांना ग्रामविकास अधिकारी ए.एम. अहिरे, कारकून गणेश यादव व शिपाई दत्तात्रय कळसकर यांनी साहाय्य केले. यावेळी चिठ्ठी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात नऊपैकी पाच मते मनीषा यादव व विष्णू सांगळे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी विक्रम सांगळे, वंदना सांगळे, शोभा देशमुख, कांताबाई शिंदे, अण्णा काकड, पोलीस पाटील शिवाजी शिंदे व संगीता काकड उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांचा ग्रामस्थांकडून हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निऱ्हाळे फत्तेपूर येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.