Aditya Thackeray vs Eknath Shinde: वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 23:26 IST2023-02-06T23:25:27+5:302023-02-06T23:26:01+5:30
ब्लू प्रिंट, दत्तक वगरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray vs Eknath Shinde: वरळी किंवा ठाणे! आदित्य ठाकरेंचे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारी नाशिकपासून सुरू झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत नाशिकची सेवा करण्याची संधी मागितली. एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी पूर्णपणे ती सेवा करेन असं आदित्य ठाकरे म्हणाले.
नाशिकचा विकास गेल्या दहा बारा वर्षांपासून चांगलाच रखडला आहे. कुणीतरी ब्लू प्रिंट आणली होती ती कुठे विरून गेली काय माहित? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तर कुणीतरी नाशिक दत्तक घेणार होतं. पाच हजार कोटी देणार होते काय झालं त्याचं? असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. नाशिकची दहा वर्षे आपण वाया घालवली आहेत. मी आज हे सांगणार नाही की माझ्याकडे अमकी-ढमकी प्रिंट आहे; तसंच मी हे देखील सांगणार नाही की मी नाशिक दत्तक घेईन कारण तेवढा मोठा मी नाही. पण एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी पूर्णपणे ती सेवा करेन, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं. मुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यांना वरळीतून लढायचं नसेल तर त्यांनी आमदारकी आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यातून लढतो, असं दुसरं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.
निवडणूक झाली तर निकालानंतर सेनेचा भगवा दिसेल
वातावरण महाराष्ट्रात इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर त्यांना मी सांगू इच्छितो की भगवा रंग एकच शिवसेनेचा. शिवसेना एकच आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.