सरकारच्या निषेधार्थ कामगार रस्त्यावर
By Admin | Updated: September 2, 2015 23:28 IST2015-09-02T23:27:47+5:302015-09-02T23:28:11+5:30
देशव्यापी बंद : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; मोदी सरकारविरुध्द तीव्र घोषणा

सरकारच्या निषेधार्थ कामगार रस्त्यावर
नाशिक : राज्य व केंद्राच्या कामगार कायद्यामध्ये कामगारविरोधी बदल क रत सरकारने अन्याय केला असून उद्योजकांच्या हितासाठी कामगारांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत शहरासह जिल्ह्यातील सर्व कामगार-शेतकरी संघटनांचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी फडणवीस व मोदी सरकारच्या निषेधार्थ मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी के ली.
कामगारांना किमान पंधरा हजार रुपये वेतन, कंत्राटी पद्धतीला आळा घालणे, सामाजिक सुरक्षा, पेन्शन अशा अनेकविध प्रलंबित मागण्या सरकारकडून मान्य न झाल्यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांकडून बुधवारी (दि.२) देशव्यापी संप पुकारला होता. या संपामध्ये जिल्ह्याची कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती अंतर्गत असलेल्या बहुसंख्य कामगार संघटनांचे कार्यक र्ते हातात लाल झेंडे व मागण्यांचे फलक झळकावित सहभागी झाले होते. संप पुकारल्यानंतर सरकारसोबत दोनदा चर्चा झाली; मात्र सदर चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे संपाची दिलेली हाक कायम ठेवत मोठ्या संख्येने कामगार शहरातील रस्त्यावर उतरले होते.
कान्हेरे मैदानापासून जिल्हा परिषदेसमोरून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्र्यंबकनाका सिग्नल, साठे चौक, खडकाळी सिग्नल, शालिमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी.रोड, मेहेर चौकातून कामगार संघटनांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. दरम्यान, मोर्चाचे नेतृत्व करणारे श्रीधर देशपांडे, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, संगीता उदमले यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कन्याशाळेजवळ बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी दुभाजक ओलांडून सीबीएस-मेहेर रस्त्यावर धाव घेतली आणि रास्ता रोको केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली अन् तत्काळ दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)
४कामगार आक्रमक; पोलीस हतबलजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर सीबीएसकडून अशोकस्तंभकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू होती. आक्रमकपणे घोषणा देत वाहतूक जिल्हा न्यायालयासमोर मोर्चेकऱ्यांनी अडविली. यावेळी सुमारे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांसमोर ठिय्या मांडणाऱ्या काही कामगारांना पोलिसांनी बाजूला हटविण्याचा प्रयत्न केला असता अन्य कामगारांनी एकच गोंधळ करत पोलिसांना घेराव घातला. एकूणच कामगार आक्रमक अन् पोलीस हतबल असेच चित्र यावेळी पहावयास मिळाले. यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना वेठीस धरले गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर सीटूचे डॉ. डी.एल. कराड यांनी मध्यस्थी करत कामगारांना बाजूला केले अन् वाहतूक सुरळीत झाली; मात्र तत्पूर्वी अर्धा तास सीबीएसवरून अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी रोखली होती.