वारकरी संप्रदायाचे कार्य विश्वव्यापक
By Admin | Updated: September 1, 2015 00:26 IST2015-09-01T00:25:31+5:302015-09-01T00:26:33+5:30
हंसदेवाचार्य महाराज यांचे प्रतिपादन

वारकरी संप्रदायाचे कार्य विश्वव्यापक
नाशिक : वारकरी संप्रदायाचे कार्य विश्वव्यापक असून, सनातन धर्माची पताका केवळ देशात नव्हे, तर परदेशात फडकविण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले, असा सूर साधुग्राममधील अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सहा खालसे, सतपंथ आश्रम आणि स्वामी जगन्नाथ हरी ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित वारकरी संतसंमेलनात उमटला.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त या संमेलनात अनेक संत-महंतांनी विचार मांडले. याप्रसंगी स्वामी जनार्दन हरी महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायातील प्रत्येक संताने विश्वकल्याणाचा विचार मांडला. आजही या विचारांची गरज आहे. तर तनपुरे महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान आहे. याप्रसंगी महामंडलेश्वर ईश्वरदास महाराज, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज, महामंडलेश्वर डॉ. अमृतदास महाराज, महामंडलेश्वर अॅड. काशीनाथ महाराज, महामंडलेश्वर अनंतदास महाराज, महामंडलेश्वर रघुनाथ महाराज, डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज आदिंनी विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतात स्वामी हंसदेवाचार्य महाराज म्हणाले की, सनातन धर्मातील सर्व संप्रदाय एकच आहेत, कारण सर्वांचा भगवान एकच आहे. यावेळी महंत श्यामसुंदरदास महाराज, संजय महाराज, भक्तिचरणदास महाराज आदिंसह संत-महंत व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचलन संतोषानंद महाराज यांनी केले.