भगूर बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:25 IST2018-12-15T22:55:59+5:302018-12-16T00:25:57+5:30
भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

भगूर बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू
भगूर बसस्थानक इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने मोकळ्या जागेत झाडाच्या सावलीत बसची वाट पाहताना प्रवासी.
भगूर : भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम आमदार योगेश घोलप यांच्या आमदार निधीतून होत आहे. जुनी बसस्थानकाची इमारत पाडून पाच महिन्यांपूर्वी नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे पाच महिन्यांपासून भगूर बसस्थानकात येणाऱ्या-जाणाºया बसेस या बसस्थानकाच्या शेजारील मैदानापासून ये-जा करीत आहे. मैदानावर किंवा रस्त्याजवळ बसेस थांबत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगारांना भर उन्हात रस्त्यावर बसची वाट पहावी लागते. तसेच मैदानावर थांबणाºया बसकरिता प्रवाशांना एका झाडाच्या सावलीत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे वयोवृद्ध प्रवासी, महिला व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
जुनी बसस्थानक इमारत पाडून नवीन इमारतीचा पाया खोदण्यात आला. मात्र सदरील काम गेल्या पाच महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे आगामी एक-दीड वर्षात बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित होईल याबाबत शाश्वती वाटत नाही. एसटी महामंडळदेखील प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्या ठिकाणी तात्पुरते शेड नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करत बसची वाट पहावी लागते.
तर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी कुठलीही सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहे.
एसटी महामंडळाचे नुकसान
भगूर जुनी बसस्थानकाची इमारत तोडल्यानंतर नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे. बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे त्रास सहन करत ताटकळत उभे राहण्यापेक्षा प्रवासी खासगी वाहतुकीने प्रवास करीत आहे. यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे.