नाशिक : गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरात केवळ नकारात्मक कामे होत असल्याच्या नगरसेवकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चार महिन्यांत तब्बल ४२ कोटी रुपयांची भांडवली कामे केल्याचा दावा करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. महापालिकेची सूत्रे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी कामे करण्याचे निकष ठरवले आणि त्रिसूत्रीत न बसणारी कामे रद्द घेण्याचा सपाटा सुरू केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनपा पदाधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता त्यावर आयुक्तांनी फुली मारली आहे. त्यानंतर आयुक्तांनी बांधकामे आणि अन्य अनेक ठिकाणी कायद्याचा बडगा दाखवण्याचे काम केले. त्यातच अनेक खात्यांचे प्रमुख त्या पाठोपाठ अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर अनेकांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे त्यापार्श्वभूमीवर शहरात नागरी कामेच होत नसल्याची टीका नगरसेवक करीत आहेत. इतकेच नव्हे घरपट्टी आणि मोकळ्या भूखंडवरील करवाढीमुळे नगरसेवक नाराज आहेत. महापालिकेत सकारात्मक काहीच होत नसल्याची टीका सातत्याने होत असून, आचारसंहितेनंतर महासभेच्या निमित्ताने रोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी या विषयावर आता महासभेत आवाज उठविण्याची तयारी केली असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात ४२ कोटी रुपयांची ५७ कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वेळोवेळी खाते प्रमुखांच्या बैठका घेऊन तसेच प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून विकासकामांना गती दिली. त्या माध्यमातून रस्ते खडीकरण, डांबरीकरण, स्वच्छतागृहे, दुरुस्ती अशी कामे पूर्ण झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे ही कामे जुनी असली तरी ती आयुक्तांनी वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
चार महिन्यांत ४२ कोटी रुपयांची कामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:00 IST