A wonderful vision of the art of the disabled | दिव्यांगांच्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन
कालिदास कलामंदिर येथे ‘कलर्स अनसिन’ संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग सादर करताना ‘विकास मंदिर’ संस्थेचे विद्यार्थी.

ठळक मुद्दे१० संस्थांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार

नाशिक : निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थेतर्फे कालिदास कलामंदिर येथे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात शहरातील १० दिव्यांग संस्थांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन घडविले.
दिव्यांग म्हटले की, त्यांच्याविषयी मनात अनेक विचार येतात, मात्र याच व्यक्तींनी सुदृढ व्यक्तींपेक्षाही उत्तमरीतीने आपल्या कलेचे सादरीकरण केल्यास ती सर्वांसाठी थक्क करणारीच गोष्ट असते. त्यामुळे अशाच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक अडचणींवर मात करून त्यांच्या अंगातील कला समाजाच्या समोर आणणे व सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘कलर्स अनसिन’ या संस्थेतर्फे शहरातील विविध दिव्यांग संस्थांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणत त्यांच्या कलाविष्कारांना चालना दिली.
यावेळी या उपक्रमात शहरातील १० दिव्यांग संस्थांतील विद्यार्थ्यांनी आपल्या अद्भुत कलांनी उपस्थितांना थक्क केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गु्रप डान्स, नाटक, मल्लखांब, संगीत
नाटक, जादूचे प्रयोग आदींचे सादरीकरण केले. महाराष्टÑात प्रथमच एकाचवेळी एवढ्या दिव्यांग मुलांना एकत्र आणत असा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनीही या विद्यार्थ्यांना भरभरून दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कलर्स अनसिन संस्थेच्या शुभदा बोरा, अनुपमा नारंग, सुनीता गणेरीवाल, विनिता बग्गा या महिलांनी
एकत्र येत या कार्यक्रमाचे
आयोजन केले होते. यासाठी
त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला, असे या महिलांनी सांगितले.
विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांचे प्रयोग
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘पडसाद’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘फुटपाथ’ या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. या नाटकाला राज्यस्तरावरही पुरस्कार मिळाला आहे. यानंतर ‘घरकुल’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत योगाचे सादरीकरण केले. तर ‘विकास मंदिर’च्या रोहित जैन या
विद्यार्थ्याने जादूचे विविध प्रयोग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तर ‘अ‍ॅबिलिटी’, ‘सिद्धिविनायक’ व ‘माई लेले’ या
संस्थांच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ग्रुप डान्स केले. तर ‘व्ही एक्सेल’
व ‘माईल्सस्टोन’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संगीत नाटकाचे सादरीकरण
केले. तर ‘घरकुल’ संस्थेच्या विद्यार्थिनींनी सोलो डान्स केला. या
सगळ्या कार्यक्रमात ‘विकास मंदिर’च्या ५ ते १० वर्षाच्या
विद्यार्थिनींनी दोरीवरच्या मल्लखांबाचे विविध प्रयोग सादर
करत उपस्थिताना थक्क केले.

Web Title: A wonderful vision of the art of the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.