महिला सक्षमीकरण सप्ताहास प्रारंभ
By Admin | Updated: August 2, 2016 01:06 IST2016-08-02T01:05:48+5:302016-08-02T01:06:28+5:30
नांदगाव : तालुक्यातील सहा मंडलांमध्ये शिबिरांचे आयोजन; दखल पात्र कामांची सरकारी दफ्तरी नोंद

महिला सक्षमीकरण सप्ताहास प्रारंभ
नांदगाव : महिला सक्षमीकरण सप्ताहाची सुरुवात येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शैला गायकवाड होत्या. तहसीलदार रचना पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दि. १ आॅगस्ट ते ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील सहा मंडलांमध्ये शिबिरे आयोजित करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या नोंदी सरकारी दफ्तरी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती पवार यांनी दिली.
सातबारा, ८ अ च्या उताऱ्यावर महिलांची नावे लागणार, लक्ष्मी योजना, अधिवास, जन्म-मृत्यू, पीकविमा योजना, आत्मा, महिला बचतगट, बीएसएनएल या व इतर बाबींशी निगडित अनेक योजनांची महिलांना माहिती देण्यात येऊन त्यांच्या नावाच्या नोंदी करण्यात येणार आहेत.
बाभूळवाडीच्या सरपंच सुशीला भोसरे यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे, नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोके, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार, सुरक्षा केसकर आदिंची समयोचित भाषणे झाली.
भाषणांमधून विविध महिला वक्त्यांनी मुलगी झाली तर दु:ख व्यक्त करण्यात येते. मुलींचे स्वावलंबन हीच देशाची प्रगती होय. सामाजिक, शारीरिक सशक्त व बौद्धिक बना, असे विचार व्यक्त केले. सिद्धी बागुल हिने बना मर्दानी.. गरजून सांगा साऱ्या जगा.. असे आवेशपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या नववी व दहावीच्या विद्यार्थिनी, शहर व ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची गर्दी होती. गुंडांना चोप देणाऱ्या महिला पोलीस मंगला बोरसे व तिची सहकारी यांचा सत्कार करण्यात आला.
शिपाई कल्पना हिचा सत्कार करण्यात आला तेव्हा भारावलेल्या कल्पनेने व्यासपीठावरील तहसीलदार रचना पवार व इतरांना आलिंगन दिले तेव्हा सभागृह भारावले. कल्पना आपल्या डोळ्यातले अश्रू रोखू शकली नाही.
सूत्रसंचालन शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती विजयालक्ष्मी आहिरे यांनी केले. त्यांनी पणती जपून ठेवा या गीताचे गायन करताना मुलींना जपा व सक्षम करा असे नमूद केले. आभार मीनाक्षी बैरागी यांनी मानले.
महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमानिमित्त नगराध्यक्ष, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी महिलाच असल्याचे अधोरेखित झाले. (वार्ताहर)