एकत्रित कुटुंब पध्दत रुजविण्यात महिलांचा मोलाचा वाटा
By Admin | Updated: November 24, 2014 23:48 IST2014-11-24T23:48:41+5:302014-11-24T23:48:58+5:30
अशोक नायगावकर : सिन्नर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहास प्रारंभ

एकत्रित कुटुंब पध्दत रुजविण्यात महिलांचा मोलाचा वाटा
सिन्नर : भारताची ताकद कोण्या राजकीय पक्षात नसून ती एकत्रित कुटुंबपध्दतीत आहे. भारतामध्ये एकत्रित कुटूंब पध्दत रुजण्यात महिलांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी विनोदी लेखक व विडंबन कवी अशोक नायगावकर यांनी केले.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या ४२ व्या ग्रंथालय सप्ताहाचे पहिले पुष्प नायगावकर यांनी गुंफले. यावेळी नायगावकर यांनी ‘हास्य हंगामा - ३’ या विनोदी कार्यक्रमातून सिन्नरकरांना पोट धरुन हसवले. ‘अशीच तिंबत कणीक राहा तू, गरम तव्यावर भाजत भाज्या, सजव आपल्या सिध्द हातांनी अन्नब्रह्म हे उदव पोकळीत’ या कवितेद्वारे नायगावकर यांनी एकत्र कुटूंब पध्दतीतील महिलांच्या योगदानाचा गौरव केला. पुराणकाळापासून आजतागायत पुरुषांच्या सरंजामशाही मानसिकतेमुळे महिलांवर होत असलेल्या अन्याय त्यांनी आपल्या विनोदी शैलीत मांडतांना सिन्नरकरांना मनमुराद हसविले. स्त्री शिक्षणानंतरच्या काळात महिलांची कार्यक्षमता दुपटीने वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्वी सर्व कवी आपल्या कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमा वापरत. यामुळे कवितेची उंचीही वाढली जायची. मात्र आजच्या पिढीला या प्रतिमांचा अर्थ समजत नसल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचे प्रसंग यावेळी नायगावकर यांनी उपस्थितांना सांगितले. पूर्वी प्रेम समुद्र किनाऱ्यावर, निसर्गाच्या सान्निध्यात फुलायचे. आता तरुणांना मोकळी हवा बाधते, हिरवळीची अॅलर्जी होते असे सांगताना प्रदुषणाची आपल्या कशी सवय जडल्याचे विदारक सत्यही त्यांनी सिन्नरकरांसमोर मांडले. सव्वाशे कोटी लोक अन् अडीचशे कोटी हातांच्या देशात शेतीत काम करण्यासाठी कोणी तयार नसल्याचे भीषण वास्तवही त्यांनी विनोदाद्वारे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. पूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली. शंभर वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी पाण्याचे हौद माणसांसाठी खुले केले. मात्र, माणसाने अविश्वासापोटी पाण्यालाही बाटलीबंद केल्याची कोपरखळीही नायगावकर यांनी मारली.
यानंतर महेश भानूशाली यांनी पशू, पक्षी, रेल्वे इंजिनचे तीन आवाज एकाच वेळी काढण्यासह नामवंत सिने-कलाकरांच्या नकला करत सिन्नरकरांची मने जिंकली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रायोजक मिलींद गुजराथी यांनी परिचय करुन दिला. याप्रसंगी सिन्नरकर उपस्थित होते. (वार्ताहर)