कर्जमंजुरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक

By Admin | Updated: April 23, 2016 00:01 IST2016-04-22T23:52:49+5:302016-04-23T00:01:55+5:30

सिडकोतील प्रकार : ११ लाखांचा अपहार

Women's cheating in the name of loan default | कर्जमंजुरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक

कर्जमंजुरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक

नाशिक : कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून अंबड परिसरातील एका बचत गटातील महिलांची सुमारे साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित वहिदा इब्राहिम खान (औदुंबर स्टॉप, सिडको) या महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वहिदा इब्राहिम खान या महिलेने बचत गटांना कर्ज मंजूर करून देते असे सांगून कर्ज न मिळाल्यास भरलेले पैसे परत देण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार कामटवाडे येथील महिला बचतगटाच्या सदस्य कल्पना शिवाजी हरिमहाले (योगेश्वर विहार, कामटवाडे) व इतर महिलांच्या घरी जाऊन पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांची रक्कम जमा करून त्यांना नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे पाच लाख रुपयांचे धनादेश दिले़
कल्पना हरिमहाले यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश देवळाली व्यापारी बँकेत टाकला असता तो न वटता परता आला़ त्यामुळे महाले यांनी कर्ज मंजुरीसाठी भरलेल्या पैसे व कर्जाबाबत विचारणा केला असता खान यांनी पैशासाठी त्रास देऊ नका अन्यथा मी तुमची पोलिसांकडे तक्रार करेल अशी धमकी दिली़ विशेष म्हणजे संशयित खानने कर्जाचे आमिष दाखवून उर्मिला गायकवाड (३ लाख ७५ हजार रुपये), सुलताना शेख (३ लाख रुपये), स्मिता नाईक (२ लाख रुपये), मीराबाई बेलदार (दीड लाख रुपये), रंजना राजपूत (७० हजार रुपये) या महिलांकडून ११ लाख ४० हजार रुपये जमा करून फसवणूक केली आहे़
या प्रकरणी कल्पना हरिमहाले यांनी संशयित खानविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बचत गटातील महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडले असून यामध्ये महिलाच सूत्रधार असल्याचे अनेकदा समोरही आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's cheating in the name of loan default