चेहेडीत दारणा नदीपात्रात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:25 AM2020-09-05T00:25:12+5:302020-09-05T01:13:31+5:30

चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही.

Woman's body in Darna river basin in Chehedi | चेहेडीत दारणा नदीपात्रात महिलेचा मृतदेह

चेहेडीत दारणा नदीपात्रात महिलेचा मृतदेह

googlenewsNext

नाशिकरोड : चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सराफ दुकानात चोरी
नाशिकरोड : बिटको महाविद्यालयामागील जगताप मळा येथे ओम गुरु ज्वेलर्स हे दुकान मंगळवारी रात्री फोडून चोरट्याने ४३ हजारांचे दागिने चोरून नेले. देवळालीगाव बाबू गेणू रोड येथे राहणारे पंकज मधुकर गव्हाणे यांचे जगताप मळ्यात ओम गुरु ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाला गोणीत डांबले
देवळालीगाव रोकडोबावाडी येथे पाच वर्षाच्या मुलास दोघांनी गोणीत डांबून ठेवल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात देवळालीगाव रोकडोबावाडी येथील बाली आत्माराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा राघव दुकानात साखर आणण्यास गेला असता, बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने त्याचा शोध घेतला जात असताना प्रतीक इंगळे व पंकज इंगळे या दोघांनी राघवला गोणीत घातलेले आढळले.
वार करून मोबाइल हिसकावला
विहितगाव, मथुरा रोड येथे गुरुवारी रात्री दोघे मित्र रस्त्याने पायी घरी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या तिघा युवकांनी एकाच्या पाठीत हत्याराने वार करून मोबाइल चोरून नेला.
विहितगावच्या समर्थनगर येथे राहणारा सिध्दार्थ जगन जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र रोशन जयप्रकाश शर्मा याच्या सोबत घरी पायी जात होता. पथदीप बंद असल्याने अंधारात मोबाइलमधील लाइट सुरू केला होता. मथुरा रोड येथे पिठाच्या गिरणीजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी रोशनच्या पाठीत हत्याराने मारले व दोघांनी हत्याराचा धाक दाखवत दहा हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.
गळफास लागून मुलीचा मृत्यू
एकलहरा गेट येथे घरात साडीची झोळी बांधून खेळत असलेल्या मुलीचा त्याच साडीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजना सुनील अहिरे (१४) असे या मुलीचे नाव असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातच बांधलेल्या साडीच्या झोळीत ती झोका खेळत होती. या दरम्यान, ती बसलेल्या झोळीचाच तिला अचानक गळफास बसला. त्यात श्वास गुदमरून ती मरण पावली. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरात घुसून मारहाण
मालकाजवळ व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून देवळालीगाव मालधक्का रोड येथे घरात घुसून चौघांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. देवळालीगाव राजवाडा, सिद्धार्थनगर येथील नसीर करीमखान पठाण याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित हमीद सुलेमान शेख, सलीम हमीद शेख, कयूम हमीद शेख, अजीम हमीद शेख (सर्व, रा. सिद्धार्थनगर) यांनी घरी घुसून तुझा भाऊ जमालने दुकानमालकाजवळ व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार का केली अशी विचारणा करून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमिष दाखवून महिलेची ८० हजारांची फसवणूक
नाशिकरोड : चांदगिरी येथील महिलेस मोबाइलवर कमी किमतीत कपडे विकण्याचे आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने ८० हजारांची फसवणूक केली.
चांदगिरी येथील कृष्णा खंडेराव बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ ते २४ आॅगस्टदरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवला. कमी किमतीत कपडे देण्याचे आमिष दाखवले. पत्नीकडून क्यू आर कोडद्वारे ८० हजार रुपये स्वीकारले. मात्र कपडे दिले नाहीत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात महिलेच्या फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman's body in Darna river basin in Chehedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.