खंडणी मागणाऱ्या श्रीरामपूरच्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:46 IST2021-04-28T22:23:28+5:302021-04-29T00:46:37+5:30
लासलगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबीयांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. या खंडणीतील ५० हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथे एका लॉजवर स्वीकारताना श्रीरामपूर येथील महिलेला बुधवारी (दि.२८) दुपारी लासलगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे भाऊ पारस ललवाणी यांच्या विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदुलाल कोठारी या महिलेने जामनेर पोलीस ठाणे येथे बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रार मागे घेण्यासाठी ज्योती कोठारी या महिलेसह तिच्या साथीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी ललवाणी कुटुंबीयांकडून मागितली होती. सदर रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिली होती.
लॉजवर धाड टाकून अटक
बुधवारी दुपारी लासलगावचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांची रक्कम घेताना ज्योती कोठारी (रा. श्रीरामपूर) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल्ल लोढा (रा.जामनेर), सुनील कोचर (रा. सिल्लोड, जि.औरंगाबाद) यांच्यावरदेखील लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासलगावची निवड का?
या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते जामनेर येथील आहेत, तर तक्रारदार महिला ही श्रीरामपूरची आहे. परंतु, खंडणी मागण्यासाठी या महिलेने लासलगावची निवड का केली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. लासलगाव पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.