Nashik Crime: तीन दिवसांपूर्वी हिरावाडीतून बेपत्ता झालेल्या भारती माणिक वल्टे या ५६ वर्षीय महिलेचा अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या महिलेचा मृतदेह हिरावाडीतील एका निर्जन भागात गवतामध्ये आढळून आला होता. उजव्या डोळ्यावर तसेच गळ्याभोवती साडी गुंडाळलेली आढळून आल्याने व निळसर काळसर व्रण असल्याने कोणीतरी घातपात केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली होती.
शक्तीनगर परिसरात राहणाऱ्या भारती वल्टे बेपत्ता झाल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांचे पती माणिक भास्कर वल्टे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. वल्टे बेपत्ता झाल्याबाबत सोशल मीडियावरसुद्धा छायाचित्रासह संदेश व्हायरल करण्यात आला होता. हिरावाडीतील भोरे नाट्यगृहाजवळ मोकळ्या पटांगणात वल्टे यांचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला होता. याप्रकरणी प्राथमिकदृष्ट्या अकस्मात नोंद करून पंचवटी पोलिसांकडून तपास केला जात होता.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी
तीन दिवसांपूर्वी हिरावाडीतील राहत्या घराजवळून बेपत्ता झालेल्या वल्टे यांचा खून कोणी व का केला? त्याचे मुख्य कारण गुलदस्त्यात असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. वल्टे यांचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह निर्जन भागात आणून टाकला का? किंवा त्यांना या घटनास्थळी आणून ठार मारले का? याचा तपास आता पोलिस करत आहेत.
अंगावरील दागिने 'जैसे थे'
बेपत्ता झाल्यानंतर वल्टे यांचा लूटमारीच्या उद्देशाने की अज्ञात कारणावरून खून केला हे स्पष्ट नाही; मात्र वल्टे यांच्या अंगावरचे दागिने 'जैसे थे' असल्याने हा खून हा लूटमारीच्या इराद्याने झाला नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या घटनेने खळखळ उडाली आहे.
शवविच्छेदनातून घातपात उघड
पोलिसांनी वल्टे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात खाना केला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली. यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास केला जात असून लवकरच मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात यश येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.