ट्रकने चिराडल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 14:59 IST2023-05-15T14:58:57+5:302023-05-15T14:59:21+5:30
या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.

ट्रकने चिराडल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार
संयज शहाणे, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : वडाळा गावातील गॅस गोदाम लगत अवजड ट्रकने चिराडल्याने दुचाकी स्वार महिला जागीच ठार झाली असून परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली अवजड वाहतूक आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल केला आहे.
पुणे- नाशिक महामार्गावरून सोमवारी (दि. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळा गावातून मुंबई महामार्गाकडे अवजड ट्रक (केए ३२ सी ६०२४) भरधाव वेगाने गॅस गोडाऊन लगतच्या रस्त्यावरून जात असताना दुचाकी (एमएच १५ एचव्ही ५९७०) ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार आम्रपाली ढेंगळे( रा. सुभाष रोड, देवळाली गाव, नाशिकरोड ) महिला जागीच ठार झाली. अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णवाहिकेतन रुग्णालयात रवाना केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी जमलेली गर्दी पोलिसांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आणखी किती बळी गेल्यानंतर वडाळा पाथर्डी रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुर केलेली अवजड वाहतूक बंद करणार असा सवाल केला.