दोन महिन्यांतच धरण भरले: नाशिककर निर्धास्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 19:49 IST2017-08-05T19:47:48+5:302017-08-05T19:49:58+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

दोन महिन्यांतच धरण भरले: नाशिककर निर्धास्त !
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने मुबलक पाणीसाठ्यामुळे नाशिककर निर्धास्त झाले आहेत.
गंगापूर धरणातील पाणीसाठ्यावर नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. दोन वर्षांपूर्वी, मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने नाशिककरांनी पाणीकपातीच्या माध्यमातून टंचाईची धग अनुभवली होती. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. त्यानंतर, मागील वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती परंतु, पुन्हा जायकवाडीसाठी पाणी जाण्याची चिंता होती. परंतु, तशी वेळ जलसंपदा विभागावर आली नाही. यंदा, फेब्रुवारीतच हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने नाशिककर सुखावले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांत वरुणराजाने नाशिक शहरावर कृपावृष्टी केली. आर्द्रा आणि पुनर्वसू तसेच पुष्य नक्षत्रातील पावसाने भरभरून हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळे जुलैच्या मध्यातच गंगापूर धरणातून विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आणि लोकप्रतिनिधींनाही जलपूजनाची लवकर संधी लाभली. जुलै महिन्यात अधिक काळ गोदावरी दुथडी भरून वाहण्याची अनुभूती नाशिककरांनी घेतली. दि. ५ आॅगस्ट अखेर गंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता.