पश्चात्तापाच्या अश्रूंना सहानुभूतीची ओंजळ लाभेल का?

By किरण अग्रवाल | Published: December 27, 2020 12:22 AM2020-12-27T00:22:37+5:302020-12-27T00:35:51+5:30

नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपत घरवापसी झाली असली तरी ती स्थानिक नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांना पचनी पडेल याची शक्यता कमीच आहे. मुंबई येथे झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नाशकातील तिघांपैकी एकही आमदार किंवा पक्ष पदाधिकारी उपस्थित नसल्याची बाब यासंदर्भात पुरेशी बोलकी आहे. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सानप यांच्या घरवापसीकडे पाहिले जात असले तरी शिवसेनेच्या नवनियुक्त महानगरप्रमुखांनीही त्यादृष्टीने चालवलेली तयारी दुर्लक्षिता येऊ नये, कारण शिवसेनेशी लढण्यापूर्वी सानप यांना भाजपतील स्वकियांचाच सामना करावा लागेल.

Will the tears of repentance shed tears of sympathy? | पश्चात्तापाच्या अश्रूंना सहानुभूतीची ओंजळ लाभेल का?

पश्चात्तापाच्या अश्रूंना सहानुभूतीची ओंजळ लाभेल का?

Next
ठळक मुद्देमाजी आमदार सानप यांची घरवापसीशिवसेनेत का जमू शकले नाही त्यांचे?नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीची गणिते यामागे आहेत हे लपून राहू नये.

सारांश

राजकारणातून अनेकांच्या दृष्टीने निष्ठा हा शब्द हद्दपार झाला खरा; पण भावनांचे हेलकावे अजूनही बघावयास मिळतात. विशेषतः दीर्घकाळ एका पक्षात राहून व त्या अनुषंगाने सारे काही उपभोगूनही अन्य पक्षात गेलेल्या आणि तेथील उपेक्षा अनुभवून स्वगृही परतलेल्याच्या भावना अनावर होणे स्वाभाविकच असते. अशावेळी डोळ्यातून ओघळणारे अश्रू हे परतीच्या आनंदाचे तर असतातच, पण त्यांना पश्चात्तापाची किनारही लाभलेली असते. नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या बाबतीतही तेच प्रत्ययास आले म्हणायचे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुन्हा तिकीट दिले नाही म्हणून पक्षांतर केलेले सानप नुकतेच भाजपत म्हणजे स्वगृही परतले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची खपामर्जी झाल्याने त्यांचे तिकीट कापले गेले व परिणामी पक्ष सोडण्याची वेळ आली असे सांगितले जात होते. त्यानंतर निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून तिकीट कपातीचे समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर नाशकातील पक्षाचा प्रभार महाजन यांच्याकडून माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे हस्तांतरित होताच माघारी परतलेल्या सानप यांचे महाजन यांच्यासह फडणवीस यांनीही कौतुक केल्याने त्यांचे मन भरून आले असेल तर स्वाभाविक ठरावे; परंतु असे असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल पुन्हा पूर्वी सारखीच स्थिती आकारास येईल का, हा खरा प्रश्न आहे.

भाजपच्या बळावर उपमहापौर, महापौर व आमदारही बनलेले सानप गेल्या टर्ममध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीतही धावत होते. पक्षाचे शहराध्यक्षपदही त्यांना भूषवायला मिळाले, पण तिकीट कापले जाताच त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले व निवडणूक लढली. यात पराभव पहावा लागल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला; पण या दोन्ही पक्षांत त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नाही, ना त्या पक्षांना सानप यांच्या येण्याचा काही लाभ झाला; त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून विरोधात असलेल्या भाजपत येण्याचा त्यांचा प्रवास घडून आला. हे काहीसे विचित्र वाटेल खरे, परंतु नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीची गणिते यामागे आहेत हे लपून राहू नये.

मुळात सानप यांची घरवापसी ही स्थानिक पातळीवरील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने घडून आलेली नाही तर वरिष्ठांकडून लादली गेली आहे. बरे त्यांच्या ओबीसी असण्याचा पक्षाला होऊ शकणाऱ्या लाभाचा विचार करायचा तर सानप यांच्यानंतर त्यांच्याच समाजाचे गिरीश पालवे यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद सोपवण्यात आले आहे, म्हणजे तोही मुद्दा खारीज होतो. सानप यांच्याच विरोधात निवडून आलेले आमदार राहुल ढिकले यांचे त्यांना पक्षात सहकार्य लाभणे शक्य नाहीच, पण आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचेही सहकार्य लाभेलच याची शाश्वती नाही, कारण गेल्या सरकारमध्ये सानपांच्याच आडकाठीमुळे मंत्रिपदाची संधी दुरावल्याची सल या दोघांमध्ये असेल तर ती अगदीच निराधार म्हणता येऊ नये. तेव्हा परतीच्या कार्यक्रमात सानप यांचे डोळे ओलावले असतील व त्यामागे पश्चात्ताप जरी असला, तरी पक्षातील स्थानिक व पूर्वीचे सहकारी त्यापुढे सहानुभूती व स्वीकारार्हतेची ओंजळ धरतील का, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरावे.

शिवसेनेत का जमू शकले नाही त्यांचे?
अनेकांना पडलेला हा प्रश्न असला तरी, ह्यआकांक्षापुढती गगन ठेंगणेह्ण ही म्हण ज्यांना ठाऊक असेल त्यांना याच्या उत्तराची गरज भासू नये. वर्षभर प्रतीक्षेत असताना विधान परिषदेसाठी सच्च्या शिवसैनिकाचे नाव गेलेले व गेलाबाजार पक्षाचे महानगरप्रमुखपदही दुसऱ्यालाच दिले गेलेले पहावयास मिळाल्याने महत्त्वाकांक्षी सानपांना घरवापसीचे वेध लागले नसते तर नवल. त्यांचे राष्ट्रवादीत जाण्याचेही संकेत होते; परंतु त्या पक्षात अगोदरच अनेकांची गौर मांडून ठेवल्यासारखी स्थिती असल्याने सानपांना घड्याळाची टिकटिक लक्षात घेता कमळ हाती घेण्याखेरीज पर्याय तरी कुठे होता?

Web Title: Will the tears of repentance shed tears of sympathy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.