अनावश्यक बॅरिकेट्स हटविणार : महाजन
By Admin | Updated: August 10, 2015 23:43 IST2015-08-10T23:42:06+5:302015-08-10T23:43:07+5:30
दखल : नागरिकांनी केली होती तक्रार

अनावश्यक बॅरिकेट्स हटविणार : महाजन
नाशिक : पोलिसांच्या अतिदक्षतेच्या कारभारामुळे साधुग्राम आणि रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास होत आहे. हा प्रकार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही साधुग्राममध्ये पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेले अनावश्यक ठिकाणची बॅरिकेट्स काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी अद्याप साधू-महंत पूर्ण संख्येने दाखल झालेले नाहीत, किंबहुना साधुग्राममध्ये अद्याप ध्वजारोहण झालेले नाही, तोच पोलिसांनी साधुग्राम आणि रामकुंड परिसरात बॅरिकेट्स टाकण्यात आले असून, अनेक भागात वाहतूक वळविण्यात आली आहे. बॅरेकेडिंगमुळे तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रामकुंड पसिरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्याच घरी जाताना किंवा बाहेर पडताना बंदोबस्तास नियुक्त केलेल्या पोलिसांशी वाद घालावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने स्थानिक नागरिक, व्यावसायिक अशा अनेक घटकांच्या भावनाही मांडल्या आहेत. यासंदर्भात नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ठिकाणी बॅरिकेट्सची आवश्यकता नाही, रहदारीला अडथळा निर्माण होत असेल साधुग्रामसह अन्य भागातील अनावश्यक बॅरिकेट्स त्वरित हटविण्याबाबत विचार होईल, असे सांगितले. अर्थात, सुरक्षेचा विषयही महत्त्वाचा असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. साधू-महंतांसह भाविकांच्या सुरक्षेसाठीच व्यवस्था असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.