धर्म संस्कृतीला कलंकित करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:30 IST2026-04-06T12:29:56+5:302026-04-06T12:30:25+5:30
अखिल भारतीय संत संमेलनाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

धर्म संस्कृतीला कलंकित करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कित्येक आक्रमणांनंतरही सनातन संस्कृती टिकून आहे. तशीच महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संतांच्या विचारांनी केवळ स्नान नाही तर आपले मनदेखील शुद्ध होते. म्हणूनच कुंभमेळ्याच्या निमित्ताने धर्मातील प्रदूषण दूर होईल असे सांगतानाच धर्माला कलंकित करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
रविवारी (दि. ५) बीएपीएस स्वामी नारायण मंदिराच्या नीलकंठ सभागृहात आयोजित अखिल भारतीय संत संमेलनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, दादा भुसे, अ.भा. संत समिती अध्यक्ष सतकैवलाचार्य अविचल देवाचार्य, अखिल भारतीय आखाडा परिषद महंत रवींद्रपुरी महाराज, निदेशक महंत ग्यान देवसिंग निर्मल आखाडा, महामंत्री स्वामी नीलेंद्रानंद सरस्वती, महंत दुर्गादास महाराज, महामंडलेश्वर यतिंद्रानंद गिरी महाराज, महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज, महंत गौरी शंकरदास महाराज, दिनेशचंद्रजी, महंत भक्तिचरणदास, महंत रामस्नेहीदास उपस्थित होते.
साधुग्रामची जागा विकत घेणार
आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतली जात होती. त्यामुळे सिंहस्थात साधुग्रामच्या जागेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यासाठी येत्या कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा थेट शासनच खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
३० हजार कोटींची कामे सुरू
मागील कुंभापेक्षा यावेळचा कुंभमेळा अधिक भव्यदिव्य राहणार आहे. प्रयागराजच्या तुलनेत आपल्याकडे जागा कमी असली तरी दोन्ही ठिकाणी स्नानासाठी घाटांची संख्या वाढविली आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सध्या ३० हजार कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत.
रस्ते, रेल्वे, विमानतळ, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी एसटीपी प्लांट यांची कामे वेगाने सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.