नाशिक - केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या शुक्रवारी नाशिक दौऱ्यात मालेगाव येथील सहकार परिषदेच्या मंचावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची लाभलेली उपस्थिती, शाह यांनी भुजबळांना पहिल्या रांगेत आपल्या शेजारी केलेले आसनस्थ आणि भुजबळांनी मोदी-शाह यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने यांचीच चर्चा दिवसभर रंगली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी अमित शाह यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत आपण भाजपत जाणार असल्याच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.मालेगाव तालुक्यातील अजंग येथे आयोजित सहकार परिषदेच्या मंचावर अमित शाह व छगन भुजबळ एकत्र आले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अमित शाह हे मंचावर आले, त्यावेळी भुजबळ यांची खुर्ची मागच्या रांगेत होती. शाह यांनी स्वत:हून भुजबळ यांना पुढच्या रांगेत बोलावून घेत त्यांना आपल्या शेजारी आसनस्थ केले.
मोदी-शाह यांच्या कामांची स्तुतीयावेळी पाच ते सात मिनिटे शाह-भुजबळ यांच्यात चर्चाही झाली. त्याचबरोबर भुजबळ यांनी आपल्या भाषणात मोदी-शाह यांच्या कामांची स्तुतीदेखील केली. राज्यसभेवर जाण्यास मी इच्छुक होतो; परंतु राज्यात तुमची गरज असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. असे सांगताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा अद्यापही असल्याचे यामधून सूचित केले.