सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार- दादा भुसे
By संकेत शुक्ला | Updated: March 23, 2025 16:10 IST2025-03-23T16:09:54+5:302025-03-23T16:10:08+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी (द. २३) नियोजीत नाशिक दौऱ्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत गैरसमज दूर करणार- दादा भुसे
संकेत शुक्ल, नाशिक : शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम राबविणार आहे. त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील. अधिवेशनातच त्याची सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर या अभ्यासक्रमाचे सर्वच स्तरात स्वागत होईल, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी (द. २३) नियोजीत नाशिक दौऱ्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
दादा भुसे म्हणाले शासकीय शालांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरू केली जाणार असल्याचेही भुसे म्हणाले. काही संस्थांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने शिक्षक भरतीसाठी वेळ वाढवून दिल्याचे ते म्हणाले. सीबीएसई आले म्हणजे बालभारती स्टेट बोर्ड यांचे अस्तित्व संपेल असे काही नाही. त्यांच्या अभ्यासक्रमातील काही भाग आपण घेणार आहोत. आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत. पालकांच्या माहितीसाठी येत्या दोन दिवसांत विधानसभेत त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून तीन वर्षांत १२ वीपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल याचे नियोजन सुरू असल्याचेही दादा भुसे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुंभमेळ्यासंदर्भात कामांची माहिती दिली जाणार असून गरजेच्या कामांबाबत आमची मागणी त्यांच्यासमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगीतले. पालकमंत्रिपदाबाबत विचारले असता त्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.