दिल्लीत कोण?

By Admin | Updated: May 15, 2014 22:24 IST2014-05-15T00:36:10+5:302014-05-15T22:24:44+5:30

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार.

Who is in Delhi? | दिल्लीत कोण?

दिल्लीत कोण?

नाशिक : अवघ्या एक दिवसावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आली असताना, अद्याप नाशिककरांचा कौल कोणाला हे स्पष्ट झालेले नाही. यंदा प्रचंड अटीतटीची लढत झाल्याने दिल्ली कोण गाठणार, याचे उत्तर देणे पंडितांनाही कठीण झाले आहे. तथापि, प्रत्येक जण आपापल्या सोयीने अर्थ काढीत असून, त्यावर पैजाही लागत आहेत. राष्टÑवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणूक लढवित असल्याने राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे. त्यातच हेमंत गोडसे यांची उमेदवारी भुजबळ यांना चांगलीच आव्हानात्मक ठरून गेली. मनसेचे प्रदीप पवार, माकपाचे तानाजी जायभावे, बसपाचे दिनकर पाटील आणि आम आदमी पार्टीचे विजय पांढरे यांच्या उमेदवारीमुळे सुरुवातीला ही निवडणूक बहुरंगी होईल असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात मात्र चर्चा भुजबळ आणि गोडसे यांच्या उमेदवारीचीच होत राहिली. त्यातच मतदानाचा वाढता टक्का हाही उत्सुकता वाढविणारा ठरला. मतदानाचा टक्का वाढताना इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६८ टक्के मतदान झाले. हे मतदान भुजबळ यांच्या पथ्यावर पडेल असे मानले जात असताना, इगतपुरी खालोखाल सिन्नरमध्ये आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातदेखील प्रत्येकी ६३ टक्के मतदान झाले असून, हे गोडसे यांना फायदेशीर असेल असे आडाखे मांडले जात आहेत. भुजबळ हे मध्य नाशिक मतदारसंघात आघाडीवर असतील असे गणित मांडले जात असताना, पूर्व आणि पश्चिम नाशिक मतदारसंघात कोण आघाडी घेईल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीप्रमाणेच मनसेला अंडर करंट जाणवत असल्याचा दावा त्या पक्षाचे कार्यकर्ते करीत असल्याने त्याबाबत मनसेही मुसंडी मारेल असे या पक्षाचे गणित आहे. माकपाचे जायभावे आणि बसपाचे दिनकर पाटील कोणाची मते खेचणार यावरदेखील निकालाचा कौल ठरेल, असा अंदाज कार्यकर्ते मांडत आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचीदेखील अशीच अवस्था असून, भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण की राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांच्याविषयीदेखील अशीच चर्चा रंगली आहे. नाशिकपेक्षा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अधिक विक्रमी म्हणजे ७० टक्के मतदान नोंदवले गेले आहे. येथे मोदी लाट आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या सर्वपक्षीय संबंधांची चर्चा असली, तरी कळवण म्हणजे भारती पवार यांच्या होमग्राऊंड असलेल्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७२.३६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. कळवणचे मतदार भारती पवार यांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात असले, तरी अन्य तालुक्यांत चव्हाण भरपाई करतील अशी चर्चा आहे. साहजिकच निकालाविषयी थेट खात्रीपूर्ण निकाल कोणीही वर्तवित नसून त्यामुळेच दिल्ली कोण गाठणार हे स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारच्या मतमोजणीपर्यंत थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Who is in Delhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.