कोठे धसका, कोठे बार फुसका
By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T23:52:14+5:302015-01-19T00:25:40+5:30
अतिक्रमणविरोधी मोहीम : गंगापूररोडला व्यावसायिक पुन्हा झाले निर्धास्त, जागांवर कब्जा

कोठे धसका, कोठे बार फुसका
कोठे धसका, कोठे बार फुसकाअतिक्रमणविरोधी मोहीम : गंगापूररोडला व्यावसायिक पुन्हा झाले निर्धास्त, जागांवर कब्जानाशिक : महापालिकेमार्फत सोमवारपासून (दि.१९) पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाणार असल्याने अतिक्रमणधारकांनी धसका घेत स्वत:हून बांधकाम हटविण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे दोन आठवड्यांपूर्वी पालिकेने मोहीम राबविल्यानंतर गंगापूररोडला मात्र व्यावसायिक व नागरिकांनी निर्धास्त राहत पुन्हा एकदा वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत सामासिक अंतरातील वाहनतळांच्या जागांवर आपला कब्जा जमविला आहे. त्यामुळे गंगापूररोडवरील मोहिमेचा बार फुसकाच ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नागरिक व व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमित बांधकाम काढून घेता यावे यासाठी आठ दिवस मोहीम थांबविली होती. या कालावधीत शहरातील सहाही विभागांत सुमारे दोन हजार अतिक्रमित बांधकामांवर रेड मार्किंग करण्याचे काम नगररचना व बांधकाम विभागाने केले. या रेड मार्किंगमुळे मोहिमेच्या वेळी नुकसान होण्याचा धसका घेत लगेचच अनेक व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. आयुक्तांनी सोमवारपासून पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी सुटीच्या दिवशीही अनेक व्यावसायिक व नागरिकांनी अतिक्रमित बांधकाम स्वत:हून हटविण्यावर भर दिला. अतिक्रमण विरोधी मोहिमेचा एकीकडे नागरिक व व्यावसायिकांनी धसका घेतला असताना दुसरीकडे महापालिकेने गंगापूररोडवर राबविलेल्या मोहिमेला दोन आठवडे उलटत नाही तोच पुन्हा एकदा व्यावसायिकांनी जागांवर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत कब्जा जमविला आहे. महापालिकेने मविप्र मॅरेथॉन चौक ते सोमेश्वरपर्यंत दुतर्फा असलेली अनेक व्यावसायिक, हॉटेल्स यांच्या अतिक्रमित बांधकामांवर जेसीबी चालविला होता. त्यात काही हॉटेल्स व्यावसायिकांनी स्वत:हून बांधकाम काढून घेण्याची विनंती केल्याने महापालिकेने तोडफोड केली नव्हती, परंतु मोहिमेनंतर काही व्यावसायिकांनी पुन्हा एकदा जागांवर कब्जा जमविताना आपले साहित्य बाहेर मांडून ठेवले आहे. एका हॉटेलचालकाने तर मोहिमेच्या वेळी अतिक्रमित बांधकामांवरील कौले काढण्याचे नाटक दाखविले, परंतु मोहिमेनंतर पुन्हा एकदा बांधकाम ‘जैसे थे’ आहे. हॉटेल दूर्वांकुरचे अतिक्रमित शेड पाडण्यात आले होते. परंतु हॉटेलचालकाने क्लृप्ती शोधत परत त्याच जागेवर चोहोबाजूने झाडांच्या कुंड्या ठेवत त्यात किचन उभारले आहे, तर हॉटेल रेडचिलीमध्येही शेडचे बांधकाम ‘जैसे थे’ आहे. साई साया फास्ट फूडचालकानेही तात्पुरत्या स्वरूपात कापडी तंबू तयार करून तेथेच पुन्हा कब्जा जमविला आहे. जितेंद्र वर्ल्ड या शोरुमचेही बाहेर आलेला नामफलक हटविण्यात आला होता, परंतु शोरुममालकाने स्वत:हून फलक हटविण्याची विनंती केल्यानंतर तोडफोड थांबविण्यात आली होती, परंतु आता फलकाचे बांधकाम न हटविता पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपात फलक उभारण्यात आला आहे. गंगापूररोडवर काही व्यावसायिकांनी निर्धास्त होत पुन्हा एकदा जागांवर कब्जा मिळविल्याने महापालिकेच्या मोहिमेचा बार फुसका ठरल्याचे चित्र दिसून येते. (प्रतिनिधी)