. अन् आमचा वाटा कुठं होय हो?
By Admin | Updated: November 18, 2015 22:37 IST2015-11-18T22:36:27+5:302015-11-18T22:37:14+5:30
सवाल : लोककवी वामनदादा कर्डक यांच्या देशवंडीतील स्मारकाची लोकार्पणापूर्वीच दुरवस्था

. अन् आमचा वाटा कुठं होय हो?
दत्ता दिघोळे नायगाव
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाची लोकपर्णापूर्वीच दुरवस्था झाली आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या स्मारकाची उपेक्षा संपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी हे वामनदादा यांचे जन्मगाव. मोठा आग्रह झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले. तथापि, त्याच्या लोकार्पणास आठ वर्षांपासून मुहूर्त सापडत नसल्याने लोककवींच्या स्मृतींचे जतन दूरच त्यांची जणू अवहेलनाच केली जात असल्याची खंत सुजाण नागरिक व वामनदादांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो?
सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठं हाय हो?
अशा नेमक्या शब्दातून सामाजिक व आर्थिक विषमतेवर बोट ठेवणाऱ्या वामनदादांच्या वाट्याला त्यांच्या मृत्यूनंतरही सन्मानाचा वाटा दिला जाऊ नये याची खंत वाटल्याशिवाय राहात नाही.
वामनदादा कर्डक यांनी लोकगीते व कवितांमधून उपेक्षित वर्गाच्या जागृतीसाठी अतुलनीय काम केले. त्यांनी रचलेली गीते व कविता मर्मग्राही तेवढ्याच चिंंतनशील असल्याने त्या लोकांच्या ओठावर खेळू लागल्या. त्यातूनच लोककवी म्हणून ते सर्वमान्य झाले. या थोर समाजसेवकाच्या जन्मगावी स्मारक उभारावे, अशी मागणी ग्रामस्थ व समाजबांधवांनी अनेकदा शासनाकडे केली. अर्थातच त्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कातकाडे यांनी या स्मारकासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. २००६-०७ या वर्षात देशवंडी येथे या निधीतून भव्य स्मारक उभे राहिले.
या स्मारकाचे बांधकाम पूर्ण होऊन आता सुमारे आठ वर्षे उलटली आहेत. मात्र अद्यापही त्याचा लोकार्पण सोहळा झालेला नाही किंवा तो व्हावा यासाठी शासकीय पातळीवर कोणती हालचालही दिसून येत नाही. स्मारकाच्या सभोवताली व जेथे जागा मिळेल तेथे आतमध्ये काटेरी झाडे, गवताने आपले बस्तान बसविले आहे. देखभालीअभावी सीमेंटचे काम उखडू लागले आहे. स्मारकात बसविलेल्या फरशीवर काटेरी झुडुपे उगवली असून, दिवसेंदिवस स्मारकाची दुर्दशा पाहवेनासी होत आहे.
आंबेडकरी चळवळीला बळ देण्यासाठी शब्दांना धार चढविणाऱ्या या लोककवीने ‘सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, तिच्यासाठी आलो मी सासरवाडीला’ अशा मुलायम तेवढ्याच गुलजार रचना करून आपल्या प्रतिभेचा प्रत्यय साहित्य वर्तुळाला करून दिला. याच कवितेत ‘नदीची वाट चुणचुण कांट पायाला बोचत राही, पोर चालत राही’ असे वर्णन करताना आपल्या स्मारकालाही अशाच काट्यातून वाट काढावी लागेल याची अपेक्षा त्यांनी केली नसावी. किंंबहुना या लोककवीने मानसन्मान आणि पोशाखी दिमाखापासून दूर राहताना चळवळीतला कवी म्हणूनच आपली प्रतिमा जपली. लोककवी म्हणून गौरव प्राप्त झालेल्या या प्रतिभावंताच्या स्मृतीभोवतीही आता काटेरी झुडपे उगवली आहेत.
लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या स्मारकाची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्याने स्मारक व त्यावर करण्यात आलेला सगळाच खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जनजागृती व्हावी, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वामनदादा कर्डक यांनी आपले आयुष्य गीत व काव्य रचनेत घालविले. जिल्हा परिषदेबरोबरच या स्मारकाकडे वामनदादांचे अनुयायी व समाजबांधवांचेही गंभीर दुर्लक्ष झाले आहे. स्मारकाच्या देखभालीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने स्मारकाची दुरवस्था होत आहे.
गाजलेल्या शेकडो गीतांचे लेखन करून मनोरंजनाबरोबरच चळवळीसाठी आयुष्य वेचलेल्या वामनदादांच्या स्मारकाच्या अवस्थेविषयी अनेकांकडून खेद भावना व्यक्त होत असली तरी त्याचे लोकार्पण व्हावे व दुर्दशा थांबावी यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने या स्मारकाचे भवितव्य काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.