यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:19+5:302021-02-05T05:45:19+5:30

नाशिक : यंदाच्या बजेटमध्ये नाशिकमधील निओ मेट्रोच्या प्रकल्पासाठी २०९२ कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाने केल्याने त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त ...

What did this year's budget give me, brother? | यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ !

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ !

नाशिक : यंदाच्या बजेटमध्ये नाशिकमधील निओ मेट्रोच्या प्रकल्पासाठी २०९२ कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाने केल्याने त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, बहुतांश नागरिकांनी आमच्या क्षेत्रासाठी काही तरतूद केल्याचेच दिसत नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, व्यापारी, शेतकरी, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरीक, गृहिणी, नोकरदार, छोटा दुकानदार, सामान्य मजूर, घरकामगार अशा प्रत्येक व्यक्तीच्याच जीवनावर कमीअधिक प्रमाणात फरक झाला आहे. त्यामुळे या प्रत्येक घटकाला काही दिलासा देऊ शकणारी घोषणा अर्थमंत्री त्यांच्या बजेटमध्ये करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात सामान्य माणसासाठी कोणताही दिलासा मिळू शकलेला नसल्याने बहुतांश नागरिकांनी आमच्यासाठी बजेटमध्ये काय मिळाले, असाच सूर व्यक्त केला.

यंदाच्या बजेटमध्ये खाद्यपदार्थ किंवा तेलासारख्या वस्तूंच्या किमती कमी होण्यासाठी कोणतीच तरतूद नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना दररोजच्या संसारातील, गृहोपयोगी वस्तूंमध्ये कोणतीही घट आलेली नसल्याने कोणताच दिलासा मिळू शकलेला नाही.

निर्मला कदम, गृहिणी

केंद्र शासनाने मेट्रोसाठी केलेल्या तरतुदीमुळे व्यापार, उद्योगाला चालना मिळू शकणार आहे. मात्र, केंद्राने जीएसटी सुरू केल्यानंतर अन्य सर्व टॅक्स संपवण्याचे दिलेले वचन पाळलेले नाही. त्यामुळे आमच्या व्यापार-धंद्यावर पडलेला करांचा बोजा कायमच राहणार आहे.

प्रफुल्ल संचेती, किराणा व्यापारी

केंद्राने जाहीर केलेल्या मेट्रो प्रकल्पासाठीच्या निधीमुळे नाशिकला मेट्रो येऊ शकणार असल्याने शासनाच्या घोषणेचे स्वागतच आहे. मात्र, सामान्य नागरिकांना करामध्ये कोणतीही सूट दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्यातून फार काही मिळालेले नाही.

संदीप दाणी, खासगी नोकरदार

नाशिक शहरातील मेट्रोसाठी केलेली आर्थिक तरतूद वगळता जिल्ह्यासाठी अन्य कोणताही मोठा प्रकल्प किंवा कोणत्याही व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, अशी घाेषणा केलेली नाही तसेच करांचे जाळे कायम ठेवल्याने व्यापारी, व्यावसायिकांची निराशा झाली आहे.

अनिल बूब, होलसेल व्यापारी

पेट्रोलचे दर वाढतच असल्याने त्यातून बजेटमध्ये काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पेट्रोलच्या किमती कमी करण्यात आलेल्या नाहीत. तसेच सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होईल, अशा उपाययोजनादेखील जाहीर केलेल्या नसल्याने दिलासा नाही.

दीपक थोरात, रिक्षाचालक

बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेला मेट्रोच्या प्रकल्पासाठीची तरतूद हा नाशिककरांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वाहतुकीचा प्रश्न सुटू शकणार असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने या निर्णयाचा खूप फायदा होऊ शकणार आहे.

प्रसाद प्रभुणे, नोकरदार

बजेटमध्ये शासनाने पेन्शनवरील करात ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट केवळ ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. त्यापेक्षा कमी वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने काहीच दिलेले नसल्यामुळे ज्येष्ठांनी अल्पशा बचतीत जीवन कसे काढायचे हा प्रश्न आहे.

इक्बाल शेख, ज्येष्ठ नागरिक

इंधनाबाबत नागरिकांचे या शासनाचे धोरण कायमच धरसाेडीचे राहिले आहे. दिवसागणिक बदलणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. तसेच पेट्रोलपंपचालकांनादेखील या सततच्या बदलत्या नियमांचा कायमच फटका सहन करावा लागत आहे.

अमोल जाधव, पेट्रोलपंपचालक

Web Title: What did this year's budget give me, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.