बोगदा बंद करून फायदा काय?
By Admin | Updated: January 20, 2016 23:16 IST2016-01-20T23:15:51+5:302016-01-20T23:16:45+5:30
कृती समितीचा ‘मार्मिक’ प्रश्न : नागरिकांकडून भरणार प्रश्नावली

बोगदा बंद करून फायदा काय?
इंदिरानगर : दहा महिन्यांपासून बंद असलेला इंदिरानगरचा बोगदा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणेकडून केली जात असलेली चालढकल पाहता, त्यातून इंदिरानगरवासीयांची फसवणूक केली जात असल्याने हताश झालेल्या येथील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून ‘बोगदा बंद करून फायदा काय?’ असा लिखित प्रश्न व त्याला ‘मार्मिक’ पर्याय सुचविले आहेत. इंदिरानगर व गोविंदनगरच्या रहिवाशांकडून सदरचे अर्ज भरून त्या माध्यमातून काढण्यात येणारा निष्कर्ष शासनाला कळविण्यात येणार आहे.
गोविंदनगर - इंदिरानगरला जोडणारा बोगदा दहा महिन्यांपासून अचानक पोलिसांनी बंद करून त्यामागे वाहतूक कोंडीचे कारण दिले आहे. बोगदा बंद झाल्याने वाहनधारकांना दोन किलोमीटरचा अधिकचा पल्ला गाठावा लागत असून, त्यामुळे वेळ व इंधनाचा चुराडा होत असल्याने हा बोगदा सुरू करावा, यासाठी वेळोवेळी राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलने केली. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभीर्य पटवून देण्यात आले; परंतु फक्त आश्वासनांपलीकडे काहीच पदरात पडले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या इंदिरानगरवासीयांनी आता बोगदा बंद करून नेमका काय फायदा परिसरातील नागरिकांना झाला, असे प्रश्न विचारणारे पत्रक तयार करून ते नागरिकांना वाटले आहे. त्यात ‘मार्मिक’ पर्याय सुचविण्यात आले असून, या पर्यायामुळेच पोलीस प्रशासनाने बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला असावा, असा निष्कर्ष काढण्यात येणार आहे. नागरिकांनी सदरचे पत्रकावरील ‘मार्मिक’ पर्याय सुचवून त्यावर आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक टाकून त्याचे छायाचित्र ९४०५१८२९९९ या क्रमांकावर व्हॉट्स अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)