नाशकात ३१ डिसेंबरला सहस्रदीप प्रज्वलनाने होणार नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:15 IST2017-12-25T22:06:19+5:302017-12-25T22:15:31+5:30
नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत

नाशकात ३१ डिसेंबरला सहस्रदीप प्रज्वलनाने होणार नववर्षाचे स्वागत
रामकुंड : शिवनेरी मंडळाचा अनोखा उपक्रम
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे या साठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ३१ रोजी रात्री आठ ते बारा या वेळेत रामकुंडावर सहस्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना आजची तरुणाई पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करीत आहेत. मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहनांवर बसून शांततेचा भंग करतात. नववर्षाचे स्वागत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्र मेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो दीप प्रज्वलित करून करण्यात येणार आहे. या सहस्रदीप प्रज्वलन सोहळ्याबरोबरच पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परूळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्र म होणार आहे.
पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा व भक्तिधारा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक सचिन ढिकले यांनी केले आहे.