जिल्ह्यात नववर्षाचे शोभायात्रांनी स्वागत
By Admin | Updated: March 28, 2017 23:50 IST2017-03-28T23:50:18+5:302017-03-28T23:50:38+5:30
नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ,अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यात नववर्षाचे शोभायात्रांनी स्वागत
नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीच्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घराघरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात सिन्नर, येवला, कळवण, पिंपळगाव बसवंत, पेठ व चांदवड येथे शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले़ यावेळी पारंपरिक वेशातील गोंधळी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, भजनी मंडळ, कोळी नृत्य, गरबा, आदिवासी नृत्य, घोडेस्वार मावळे, राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी आदिंच्या वेशभूषेतील तरुण-तरुणी, चित्ररथ, संबळ व पिपाणी पथक, डफ, हलगी, तुणतुणे, विविध शाळांची लेजीम व बॅण्डपथके यासोबतच शहरातील अनेक तरुण व महिला मंडळांनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेच्या मार्गावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या़ चांदवड मराठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी, गुढीपाडव्यानिमित्त रंगमहालापासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सशस्र संचलन केले. प्रारंभी संघचालक व भारतमातेचा रथ होता. संघाच्या कार्यकर्त्यांनी संघाची शपथ व प्रार्र्थना घेऊन सुरुवात केली. संचलन श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवारपेठ, बाजार पटांगण येथून समारोप झाला. (लोकमत चमू)
परंपरेची जपणूक
हिंदू पंचांगातील नववर्षाच्या प्रभातकाली काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील विविध वेशभूषांनी परंपरेची जपणूक करण्याचा संदेश देतानाच महाराष्ट्रीयन मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेतील वासुदेव, गोंधळी हे दिसेनासे झाले असले तरी मिरवणुकीत त्यांचे दर्शन झाले. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थी चमूने सादर केलेल्या लेजीम नृत्य, ढोलकी, संबळ, सनई, टाळ, मृदंग या संगीतमय सुरावटीनी परंपरा टिकून राहिली असल्याचे मिरवणुकीतून दिसून आले.
सिन्नरला शोभायात्रा
सिन्नर येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला व युवतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. मंजूळ स्वरांतील विविध पारंपरिक वाद्यांच्या सुरावटींनी नागरिक हरपून गेले होते. डिजिटलच्या जमान्यात अद्यापही आपले अस्तित्व टिकून असलेल्या पारंपरिक संबळ-पिपाणीच्या तालावर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरत नाचायला सुरुवात केली. महिलांनी फुगड्या खेळल्या. चित्ररथ, संबळ व पिपाणी पथक, डफ, हलगी, तुणतुणे, ढोल पथक, लेजीम पथकाने उत्साहाला भरते आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
आंबेगण शाळेने उभारली शैक्षणिक गुढी
पेठ : आंबेगण येथील आश्रमशाळेत मराठी नववर्षाचे स्वागत शैक्षणिक गुढी उभारून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा संदेश देत करण्यात आला. शाळेच्या आवारात भव्य गुढी उभारण्यात आली. या शैक्षणिक गुढीवर बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाणी वाचवा, पाणी जिरवा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया असे संदेश लावण्यात आले होते. स्त्रीभ्रूणहत्त्या ही समाजाला लागलेली कीड असून, त्यावर विद्यार्थ्यांकडून जनजागृती होणे आवश्यक असल्याने मराठी नववर्षाच्या निमित्ताने शैक्षणिक जनजागृती करण्यात आंबेगण आश्रमशाळेने घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. आर.आहिरे, उपशिक्षक पी.पी. महाले, एस.बी. कोळेकर, एच.एस. भामरे, एस. डी. चंद्रात्रे, ए.पी.तुसे, ए.के. सावंत, चिंचोरे, एल. एम. गायकवाड, भामरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.