जिल्ह्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By Admin | Updated: March 29, 2017 00:04 IST2017-03-29T00:04:06+5:302017-03-29T00:04:21+5:30

नाशिक : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी बाणा व संस्कृती टिकविण्यासाठी जिल्ह्यात गुढ्या उभारून व शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

Welcome to the new year celebration of the district | जिल्ह्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी बाणा व संस्कृती टिकविण्यासाठी जिल्ह्यात गुढ्या उभारून व शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सिन्नर येथील सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शोभायात्रा कार्यक्रमास सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी शिवाजी चौकात वंदे मातरम् संघटनेची सुमारे २१ फूट उंच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने पाडव्याचा सण व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात  आले.  हिंदू नववर्षाची सुरुवात मंगलमय सुरावटींच्या ताला-सुरात व्हावी व एकमेकांना शुभेच्छा देऊन मराठी संस्कृतीची जपणूक करण्यात यावी या उद्देशाने सांस्कृतिक मंडळाने सुरू केलेल्या शोभायात्रेने गुढीपाडव्याचा उत्साह द्विगुणित झाला.  मराठीचा गोडवा टिकावा, सण-संस्कृतीने आपापसातील दुरावा कमी होऊन सर्वांनी एकोप्याने राहावे, जाती-धर्मातील तेढ कमी व्हावी व नव्या पिढीला जुन्या संस्कृतीचे दर्शन व्हावे तसेच त्यांनीही त्यात सहभागी होऊन पाडव्याच्या सांस्कृतिक गोडव्याची अनुभूती यावी या उद्देशाने सुरू केलेल्या पाडव्याच्या शोभायात्रेने सिन्नरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  मंगळवारी सकाळी शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे प्रणेते कृष्णाजी भगत, प्रकाश नवसे, नगराध्यक्ष किरण डगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, डॉ. बी. एन. नाकोड, पोलीस निरीक्षक  मुकुंद देशमुख, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते पूजन करून  गुढी उभारण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री  गणेश पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली.  शोभायात्रेत वंदे मातरम्चे संस्थापक जितेंद्र कोथमिरे, मनोज भंडारी, डॉ. महावीर खिंवसरा, पराग शहा, सुधीर वाईकर आदिंसह माहेश्वरी युवक मंडळाचे सुरेश नावंदर, सुशील जाजू, मुन्ना लोया, बाजार समितीचे संचालक सुनील चकोर, नगरसेवक गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, नगरसेवक सुजाता तेलंग, ज्योती वामने, सुजाता भगत, विजया बर्डे, संजय नवसे, मनोज भगत, किरण पेटकर, राजाराम मुंगसे, मु. शं. गोळेसर, पी. एल. देशपांडे, रत्नाकर पवार, मोतीलाल खिंवसरा, गोविंद कोरडे, फकिरा हिरे, बाळासाहेब गाडे, सूर्यभान शिंदे, सुहास देशपांडे, चंद्रशेखर कोरडे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय, संजय चव्हाणके, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, प्रा. त्र्यंबक खालकर, मनीष गुजराथी, प्रा. जावेद शेख यांच्यासह असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला.
शोभायात्रेच्या मार्गावर गुढ्या, तोरणे उभारून नागरिक यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज होते. प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढून यात्रेचे स्वागत होताच सामील होणाऱ्या नागरिकांमुळे शोभायात्रेची संख्या वाढत होती. वसंत ऋतूतील सकाळच्या प्रहारी भजनी मंडळाने टाळ-पखवाजच्या तालात मंगलमय भजने गात शोभायात्रेस प्रारंभ केला. त्यानंतर अनेक कलाकारांनी ढोलकी, ताशा, संबळ, सनईच्या सुरावटींनी आणखीच स्फूर्ती वाढविली आणि अनेकांचे पाय थिरकू लागल्याने आबालवृद्धांनी तालासुरात ठेका धरला अन् वातावरणाला उत्साहाचे भरते आले. विविध शाळांची  लेजीम व बॅण्डपथके, वाजे विद्यालयाचे पारंपरिक ढोल पथक, रुद्र ढोलताशा पथक यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथील सिन्नर महाविद्यालय, लोकनेते शं. बा. वाजे विद्यालय, भिकुसा हायस्कूल, चांडक कन्या विद्यालय, महात्मा फुले विद्यालय यांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग घेतला. त्यात राजा शिवछत्रपती, छत्रपती शाहू महाराज, खंडेराव, माँ जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा नागरिकांना आकर्षित करून गेल्या. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही मुलींनी तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला. झिम्मा-फुगडी खेळून मिरवणुकीचा उत्साह वाढविला. या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी स्त्रीशक्ती गीतांचे गायन केले.
शिवाजी चौक, गणेशपेठ, शिंपी गल्ली, लाल चौक, गंगावेस, खडकपुरा, जुनी नगरपालिका, महालक्ष्मी रोड, नाशिकवेस, खासदारपूल यामार्गे शोभायात्रा नर्मदा लॉन्सवर पोहचली. शोभायात्रेत सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांसह लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. प्रा. जावेद शेख, प्रा. राजाराम मुंगसे, मनोहर कासार आदिंसह विविध शाळांच्या शिक्षकांनी शोभायात्रेत सहभाग घेत नियोजन केले.  पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे, मुख्तार सय्यद, उपनिरीक्षक तृप्ती आठवले, हवालदार कैलास व्यवहारे, भगवान शिंदे, सचिन गवळी, उदय पाठक  यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन  चोख बंदोबस्त ठेवला.  आमदार राजाभाऊ वाजे यांनी सहभाग घेऊन यात्रेचा उत्साह वाढवला. शोभायात्रेत सहभागी शाळांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
चांदवड शहरातून संचलन
४चांदवड : येथील रंगमहालापासून मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र संचलन केले. अग्रभागी सरसंघचालकांची प्रतिमा असलेला रथ होता. संघाच्या स्वंयसेवकांनी संचलन केले. रंगमहालापासून संघाची शपथ व प्रार्र्थना घेऊन याची सुरुवात झाली. श्रीरामरोड,  शिवाजी चौक, सोमवारपेठ,  बाजार पटागंण येथे संचलनाचा समारोप झाला. संघाचे सर्व नेते व कार्यकर्ते संचलनात सहभागी झाले होते. संघाचे संचलन निघणार असल्याने सकाळपासूनच चांदवड शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा महिलानी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. चांदवडचे  पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, मंगेश डोंगरे, व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




 

Web Title: Welcome to the new year celebration of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.