Welcome to the new colors in schools | शाळांमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा
शाळांमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा

नाशिक : उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून शालेय जीवनातील त्यांचे पहिले पाऊल जपण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा शहरात सर्वत्र रंगला होता.
गुलाबपुष्पाने मुलांचे चेहरे खुलले : उन्नती प्राथमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शोभा रोकडे यांनी औक्षण केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक कमलेश बोडके, लक्ष्मण धोत्रे, संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, चंदन मेखे, शालेय समिती अध्यक्ष सुभाष मुसळे, धांडे आदी उपस्थित होते. प्रमोद कोठावदे यांनी सूत्रसंचालन केले.
जाजू विद्यालय
राणेनगर येथील जाजू विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सहचिटणीस चंद्रावती नरगुंदे, संगीता जाधव, अमोल जाधव, मुख्याध्यापक अजय पवार, मुख्याध्यापिका संगीता गजभिये यांच्या हस्ते नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन गोरक्षनाथ वाणी तर आभार हरिदास चौधरी यांनी मानले.
अभिनव बालविकास शाळेत स्वागत
नाशिक : मविप्र संचलित अभिनव बालविकास शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यासोबतच पाठ्यपुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक नानासाहेब महाले, शालेय समिती सदस्य डॉ. नानाजी भामरे, अर्चना सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, शोभा गायकवाड, ज्योती पवार उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन सदस्य नानाजी भामरे उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात नानासाहेब महाले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संदेश दिला. मीनाक्षी गायधनी यांनी प्लास्टीक मुक्तीचा संदेश दिला. संगीत शिक्षक विलास पाटील, कांचन गोसावी, पूजा हिरे यांनी गाणी सादर केली. सूत्रसंचलन सुवर्णा गोस्वामी यांनी केले, तर ज्योती पवार यांनी आभार मानले.
डे केअरचा उपक्रम पहिल्या दिवशी ‘आनंद मेळावा’
इंदिरानगर : ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेत शाळेचा पहिला दिवस ‘आनंद मेळावा’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक प्रथमेश कोरगावकर, विशाखा भंडारी (सी.ए) उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव अंजली पाटील, बाबा कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, अनिल भंडारी, छाया निखाडे, मुग्धा सापटणेकर, शरद गिते, माधुरी मरवट, विद्या अहिरे, पूनम सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी विविध खाऊच्या स्टॉलवर जाऊन खाऊचा आस्वाद घेतला. आनंदवन बालमंदिराच्या मराठी माध्यमात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
इयत्ता पहिली, पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. इ.१०वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी नेमाडे, मेघा जगताप यांनी केले.

 


Web Title:  Welcome to the new colors in schools
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.